दिवाळीचा सण संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून, खासगी बसेस आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसचा प्रवास आता अधिक महसुली भार टाकणारा ठरणार आहे. डिझेल, टायर, बॅटरी, इंजिन ऑइल आणि विविध स्पेअर पार्ट्सच्या किमतीत झालेली बेसुमार वाढ तसेच वाहनांच्या देखभालीचा खर्च तिप्पट झाल्यामुळे प्रवासी वाहतूक दरात सरसकट 20 ते 25 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनच्या वतीने ही घोषणा करण्यात आली असून, मागील 5 वर्षांच्या कालावधीत बस प्रवासाच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करता महागाईचा ताण सहन करणाऱ्या बस मालकांसाठी हा निर्णय व्यवसाय टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अपरिहार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्कूल बसपासून कंपनी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीवर होणार परिणाम
पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रमुख मानल्या जाणाऱ्या ‘पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन’चे सुमारे 1400 हून अधिक सभासद आहेत. या संघटनेच्या माध्यमातून प्रासंगिक करारावर चालणाऱ्या प्रवासी बसेस, शैक्षणिक सहली, लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसेस तसेच पुणे परिसरातील नामांकित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या स्टाफ बसेस मोठ्या प्रमाणावर चालवल्या जातात. संघटनेचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बस आणि टेम्पो ट्रॅव्हलरपासून ते मोठ्या बसेसपर्यंत सर्वच वाहनांच्या किमती गेल्या काही वर्षांत दुप्पट झाल्या आहेत. याशिवाय टायर्सचे दर दीडपट, इंजिन ऑइलचे दर 70 ते 80 टक्क्यांनी वाढले असून, नव्याने समाविष्ट झालेला ॲडब्लूचा खर्च, चालकांचे वेतन, विमा आणि शासकीय करामुळे मालकांची आर्थिक कोंडी होत होती.
किलोमीटरनुसार नवे दर लागू
या सुधारित दरवाढीनुसार 13 सीटरपासून ते 49 सीटरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या बसेसचे प्रति किलोमीटर भाडे वाढणार आहे. सुधारित दरानुसार 17 सीटर बसचा दर 23 रुपयांवरून वाढवून 27 रुपये करण्यात आला आहे. तसेच 20 सीटर बससाठी 25 रुपयांऐवजी 30 रुपये, 32 सीटरसाठी 33 रुपयांऐवजी 38 रुपये, तर 35 सीटरसाठी 36 रुपयांऐवजी 42 रुपये दर आकारला जाईल.
हेही वाचा – मोठी बातमी! सोलापूर-तुळजापूर महामार्ग बंद राहणार; नेमकं कारण काय आणि पर्यायी मार्ग कोणते?
याशिवाय 40 सीटर बसचा दर 41 रुपयांवरून 45 रुपये करण्यात आला असून, मोठ्या अशा 45 सीटर आणि 49 सीटर बसेसचे दर 45 रुपयांवरून थेट 55 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे बस मालकांना काहीसा आर्थिक दिलासा मिळणार असला, तरी याचा थेट आणि नाहक फटका सर्वसामान्य प्रवासी, शाळांच्या सहलींचे नियोजन करणाऱ्या शाळा आणि पालकांच्या बजेटवर बसणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.