Monday, March 09, 2026 08:56:27 AM

Pune News: पुणेकरांनो सावधान! धुलीवंदनाला 'ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या गाड्या जागीच होणार जप्त; पोलिसांचा 30 ठिकाणी कडा पहारा

पुणे शहर वाहतूक शाखेचे DCP हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या विविध भागांत उद्या विशेष नाकेबंदी करण्यात आली आहे.

pune news पुणेकरांनो सावधान धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राईव्हच्या गाड्या जागीच होणार जप्त पोलिसांचा 30 ठिकाणी कडा पहारा

Pune News: संपूर्ण देशभरात उद्या धुळवड हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणाचे औचित्य साधून अनेक जण मौजमजा करण्यासाठी मद्यपान करतात. मात्र, जर तुम्ही मद्यप्राशन करून वाहन चालवणार असाल, तर पुणे पोलिसांची करडी नजर तुमच्यावर असणार आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे DCP हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या विविध भागांत उद्या विशेष नाकेबंदी करण्यात आली आहे. "सर्व पुणेकरांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा, पण वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी कोणीही मद्यपान करून वाहन चालवू नये," असे आवाहन पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांनी केले आहे.

850 पोलिसांचा फौजफाटा आणि 30 ठिकाणी नाकेबंदी
उद्याच्या बंदोबस्तासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने सूक्ष्म नियोजन केले आहे. शहराच्या हद्दीत एकूण 30 प्रमुख ठिकाणी 'ड्रंक अँड ड्राईव्ह' चेकिंगसाठी नाकेबंदी लावली जाणार आहे. या मोहिमेसाठी वाहतूक शाखेचे 850 पोलीस कर्मचारी तैनात असतील, ज्यांना स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचीही साथ मिळणार आहे. ज्या ठिकाणी होळी आणि धुलीवंदनाचे सार्वजनिक कार्यक्रम आहेत, तिथे स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जर एखादा वाहनचालक मद्यपान करून गाडी चालवताना आढळला, तर त्याचे वाहन जागीच जप्त करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयीन कारवाई आणि दंडाचा बडगा
मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध केवळ दंड आकारून पोलीस थांबणार नाहीत. जप्त केलेली वाहने आणि संबंधित चालकांवरील केसेस पुढील 2 ते 3 दिवसांत थेट न्यायालयात सादर केल्या जातील. न्यायालयामार्फत त्यांना कायदेशीर शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे सणाचा आनंद घेताना कायद्याचे उल्लंघन महागात पडू शकते. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी हे कठोर पाऊल उचलले आहे.

4 दिवसांत 19 लाख जणांना नोटीस; 400 कोटींचा दंड प्रलंबित
वाहतूक शाखेने प्रलंबित दंडाबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या 4 दिवसांच्या कालावधीत सुमारे 19,59,000 वाहनचालकांना अधिकृत मेसेजद्वारे नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या 4 दिवसांत पुणेकरांनी 3 कोटी 13 लाख रुपयांचा दंड ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. तरीही, 2017 पासून पुणेकरांकडे तब्बल 375 ते 400 कोटी रुपयांचा दंड थकीत आहे. हा दंड पुढील 30 दिवसांच्या आत भरून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती DCP हिम्मत जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा -  Israel-Iran War : इराण-इस्रायल युद्धाचा जळगावच्या केळीला फटका; निर्यातीवर परिणाम झाल्याने दरात 1000 रुपयांची घसरण

पुणेकरांच्या सुरक्षेसाठी महापालिका सरसावली
दरम्यान, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भयंकर युद्धस्थितीचा फटका तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाही बसला आहे. या युद्धग्रस्त भागात पुण्याचे अनेक नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महानगरपालिकेने तातडीचे पाऊल उचलले आहे. पुण्याच्या महापौरांनी पालिकेच्या आयुक्तांना युद्धात अडकलेल्या पुणेकरांच्या मदतीसाठी एक 'विशेष मदत कक्ष' (Special Help Desk) आणि 'डेटा बँक' तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. 

पुण्यात असणाऱ्या नातेवाईकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे, त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी पालिका 24 तास चालणारी हेल्पलाईन सुरू करत आहे. नातेवाईकांनी अडकलेल्या व्यक्तींचा पासपोर्ट नंबर, तिथला पत्ता आणि संपर्क क्रमांक पालिकेला द्यायचा आहे. ही सर्व माहिती थेट परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्र सरकारला पाठवली जाणार आहे जेणेकरून आपल्या पुणेकरांना सुरक्षित मायदेशी आणता येईल. 
 


सम्बन्धित सामग्री