बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर वादात अडकला आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना, निर्मिती हक्कांवरून निर्माण झालेल्या वादामुळे हा सिनेमा न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी या निर्मिती संस्थेने अभिनेता-दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर आणि त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने करारभंग, कॉपीराइटचे उल्लंघन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे.
हा वाद 2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाच्या बौद्धिक संपदा हक्कांशी संबंधित आहे. त्या वेळी हा चित्रपट एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी अश्वमी फिल्म्स या बॅनरखाली संयुक्तपणे निर्माण केला होता. करारानुसार एव्हरेस्टकडे 60 टक्के आणि मांजरेकर यांच्याकडे 40 टक्के मालकीहक्क असल्याचे नमूद करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून तात्पुरता निर्णय दिला आहे.
न्यायालयाने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या नव्या चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटसाठी आयोजित करण्याचे आदेश दिले असून, हे प्रदर्शन 20 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. या आदेशामुळे सध्या संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
हेही वाचा : Purna Aaji Entry : ‘ठरलं तर मग’ मालिकेत नव्या 'पूर्णा आजी'ची दमदार एन्ट्री; प्रोमो पाहून प्रेक्षक झाले खूश
या चित्रपटाच्या टीझर लॉन्च कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाच्या कारणामुळे अनुपस्थित राहिले. राज ठाकरे यांनी या प्रसंगी महेश मांजरेकर यांचे कौतुक करत म्हटले, “शिवाजी महाराजांवरील चित्रपट काढण्यासाठी जो भाव लागतो, तो महेशमध्ये आहे. तो एक झपाटलेला माणूस आहे. ‘शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा शहरी प्रेक्षकांसाठी होता, तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा ग्रामीण समाजातील वास्तवावर भाष्य करणारा सिनेमा आहे. शेतकरी आत्महत्यांवर प्रकाश टाकणारा हा विषय अतिशय धाडसी आहे.”
दरम्यान, या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना वाटले की तो ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चा सिक्वल आहे. मात्र, महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले आहे की, “हा सिनेमा त्या चित्रपटाचा पुढचा भाग नाही. हा आमच्या श्रद्धेतून निर्माण झालेला स्वतंत्र चित्रपट आहे. त्याचा विषय पूर्णपणे वेगळा आहे.”
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ या गाण्यामुळे सिनेमा पुन्हा चर्चेत आला होता. गाण्यातील महेश मांजरेकर यांचा लूक प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला. भगवा कपडा, रुद्राक्षांच्या माळा, विस्कटलेले केस, लांब दाढी आणि हातात शंख अशा साधूच्या रूपात ते दिसले. या लूकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. सध्या न्यायालयीन आदेशानंतर चित्रपटाचे भवितव्य ठरवले जाणार आहे. मात्र, या वादामुळे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.