Wednesday, April 22, 2026 10:31:51 PM

Rahuri Byelection : राहुरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट! 'तालुक्याच्या अस्मितेसाठी लढणार'; ठाकरेंच्या निष्ठावान नेत्याची बंडखोरी

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खेवरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी राहुरी तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचे सांगितले.

rahuri byelection  राहुरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट तालुक्याच्या अस्मितेसाठी लढणार ठाकरेंच्या निष्ठावान नेत्याची बंडखोरी

Shivsena Rebellion in Rahuri Byelection : अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान नेते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे, ज्यांनी तब्बल 32 वर्षे पक्षासाठी काम केले आहे, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि 'बाहेरचा' उमेदवार थोपवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले आहे. ही बंडखोरी नसून राहुरीच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बंडखोरी की तालुक्याची अस्मिता?
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खेवरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "जर या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे हे स्वतः उभे असते, तर मी कधीच अर्ज भरला नसता. त्यांच्या विरोधात लढणे ही बंडखोरी ठरली असती. मात्र, दादांनी माघार घेतल्यामुळे आता तालुक्याला स्थानिक प्रतिनिधित्वाची गरज आहे," असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दिलेले एबी फॉर्म घेण्यास नकार देत, आपण सर्वांना सोबत घेऊन चालणारा चेहरा म्हणून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

तरुणांचे प्रश्न आणि हिंदुत्वाचा अजेंडा
गेल्या 32 वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचे आणि समाजकारणाचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी बोट ठेवले. 'पदवीधर तरुणांना नोकरीसाठी कुठे जायचे, हा मोठा प्रश्न आहे. तालुक्यात नवीन उद्योग किंवा रोजगाराच्या संधींची वानवा आहे. शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी धावून जाणे ही आपली ओळख आहे', त्यांनी सांगितले. 'आपण कडवट हिंदू असलो तरी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आपले हिंदुत्व आहे,' असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा - Samarjeet Ghatge: पश्चिम महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; समरजीत घाटगे यांची भाजपमध्ये 'घरवापसी'

उद्धव ठाकरेंच्या आदेशाबाबत भूमिका
मातोश्रीवरून निरोप आल्यास उमेदवारी मागे घेणार का, या प्रश्नावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "उद्धव साहेबांचा आदेश मी कधीही डावलणार नाही. मी दोन वेळा त्यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी प्राजक्त तनपुरे मंत्री राहिल्याचे सांगून त्यांनाच पाठिंबा देण्याचे सूचित केले होते. मात्र, काल सकाळी 11 वाजेपर्यंत परिस्थिती गुलदस्त्यात होती. जर दादांनी दोन दिवस आधी माघार जाहीर केली असती, तर मला पक्षाचा अधिकृत फॉर्म नक्कीच मिळाला असता," असे त्यांनी स्पष्ट केले.

प्राजक्त तनपुरे यांना पाठिंब्याचे आवाहन
तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी प्राजक्त दादा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. "मी सुद्धा दादांचा मन लावून प्रचार केला होता आणि त्यांना आमदार करण्यात माझा खारीचा वाटा होता. आता त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्या पाठीशी उभे राहावे," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून, राहुरीची निवडणूक आता चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.

 

हेही वाचा - Sunetra Pawar Property: पवार कुटुंबाच्या मालमत्तेचा थक्क करणारा लेखाजोखा; शरद पवार की सुनेत्रा पवार कोण आहे वरचढ?


सम्बन्धित सामग्री