मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठा धक्का बसला असून पक्षातील नेते समरजीत घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. घाटगे यांच्यासोबत अखिलेश सिंह घाटगे आणि विजेंद्र सिंह घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
“फडणवीस मला भावासारखे”
पक्षप्रवेशानंतर बोलताना समरजीत घाटगे म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून मी पक्षप्रवेशाची तयारी करत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला भावासारखे आहेत.”
हेही वाचा: Traffic Diversion: पुणे-सासवड प्रवास करताय?; 'या' कारणामुळे सासवड रस्ता बंद; पाहा पर्यायी मार्ग
भाजपकडून स्वागत
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी घाटगे यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीचे कौतुक करत त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“दिलेली जबाबदारी पार पाडेन”
समरजीत घाटगे यांनी सांगितले की, “पक्ष मला जी काही जबाबदारी देईल, ती मी पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन.”
राजकीय पार्श्वभूमी
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपात कागल मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला गेल्याने भाजपाकडून उमेदवारी मिळणार नाही. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. तसेच त्यांनी कागलमधून हसन मुश्रिफ यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत घाटगे यांना मुश्रिफ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
एकूणच, घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Eknath Shinde : इथून पुढे फक्त 'क्वालिटी'वर भर! एकनाथ शिंदेंचा संघटना बांधणीसाठी नवा प्लॅन; अकार्यक्षम नेत्यांना थेट...