रायगड: रायगड किल्ल्यावरील टकमक टोक परिसरात 37 वर्षीय सुयोग पांचाळ यांचा मृतदेह सुमारे 800 फूट खोल दरीत आढळून आला आहे. ठाणे येथील रहिवासी असलेले सुयोग पांचाळ हे रायगड किल्ल्यावर गेले होते. याचदरम्यान त्यांनी घरच्यांना फोन करून ‘मी आयुष्य संपवत आहे’ असं सांगितल्याची माहिती समोर आली होती.
घरच्यांना फोन केल्यानंतर मोबाईल बंद
सुयोग यांनी कुटुंबीयांना फोन केल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
सुयोग यांचे भाऊ सुवेल पांचाळ यांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांची दुचाकी आढळून आल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर महाड तालुका पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
टकमक टोक परिसरात शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलिस, बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांनी टकमक टोक परिसरात शोधमोहीम सुरू केली. परिसरातील अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे शोधकार्य आव्हानात्मक ठरत होते.
शोधमोहीम सुरू असतानाच सुयोग पांचाळ यांचा मृतदेह सुमारे 800 फूट खोल दरीत आढळून आला. बचाव पथकाने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही केली.
‘आयुष्य संपवत आहे’ असं सांगून मोबाईल केला बंद
सुयोग यांनी घरच्यांना फोनवर ‘मी आयुष्य संपवत आहे’ असं सांगितल्यानंतर मोबाईल बंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी असा निर्णय का घेतला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या या निर्णयामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.