मुंबई: राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ सांगितला. मतदार यादींमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणूका घेऊ नका असे निवडणूक आयोगाला सांगितल्याचे राज यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हणाले की, मतदार यादीमध्ये घोळ आहे, निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींसमोर आम्ही ठेवले आहेत. त्या सुधारल्या पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे. जे निवडणुका लढवतात त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते, पण आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते, पण मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन सगळ्या याद्या असतात, याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
हेही वाचा: Devendra Fadnavis On Gadchiroli Naxalites: माओवादी भूपतीसह 60 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मतदार यादीतील घोळावर आणि राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने टीकेची झोड उठवली आहे. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. आता जो खेळ सुरू आहे. खोटा कारभार सुरू आहे. म्हणूनच म्हटलंय निवडणुका घेऊ नका. हा घोळ दुरुस्त करा. निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित निवडणूक पार पाडणं आहे. त्यावेळी आमच्याकडून चूक झाली तर आमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो. करप्ट प्रॅक्टिस म्हणून. म्हणून आम्ही म्हणतो ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. हा त्यांचा भ्रष्टाचार आहे. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा हक्क हिरावला होता. आता निवडणूक आयोगाला काय शिक्षा करायची, असा सवाल त्यांनी केला.
भाजपची यामध्ये ढवळाढवळ नसेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन त्यांनी भाजपला केले. हा सर्वच पक्षांचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले. मतदान यादीतील घोळावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही त्यांनी ताशेरे ओढण्याचे काम केले. निवडणूक आयोग उत्तरच देत नसल्याचे आणि अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचे त्यांनी सांगितले.