मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी 5:00 च्या सुमारास एक भीषण अपघात झाला होता. प्रोपिलिन हा अत्यंत ज्वलनशील वायू वाहून नेणारा एक भरधाव टँकर उतारावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाला आणि त्यातून मोठी गॅस गळती सुरू झाली होती. या एका घटनेने राज्याची ही जीवनवाहिनी तब्बल 27 तासांहून अधिक काळ विसकळीत झाली असून, हजारो प्रवाशांचे आयुष्य रस्त्यावरच थांबले होते. त्यानंतर तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पडलेला गॅस टँकर हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. आता तब्बल 32 तासांच्या प्रयत्नानंतर मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे. यावेळी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पोलीस यंत्रणा, एनडीआरएफची टीम, फायर ब्रिगेडचे जवान, ओएनजीसीमधील तज्ज्ञ पथक, सीआयएसएफचे जवान तसेच स्थानिक स्वयंसेवक शर्थीचे प्रयत्न करत होते. दरम्यान गॅस टँकर हटवताना कोणाताही हलगर्जीपणा अंगाशी येऊ नये यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता. सर्व यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा धोका टळला.
हेही वाचा- Mayor Election: महानगरपालिकेच्या 'महापौर' पदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडमोडी; भाजपचे 65 नगरसेवक अचानक 'नॉट रिचेबल'; नेमकं चाललंय काय?
यानंतर आता मनसे नेते राज ठाकरे यांनी या प्रकरणी दखल घेत सरकारला प्रश्न केला आहे. तसेच सरकार समोर कालचा प्रकार लक्षात घेता काही मागण्या मांडल्या आहेत.
यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअक करत म्हटलं आहे की, "मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.
मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ? परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.
हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.
ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.
राज ठाकरे ।"
नेमकं काय घडलं होत?
मुंबई–पुणे महामार्गावर आडोशी बोगदाजवळ वायू वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाल्यामुळे या अपघातानंतर मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी जवळपास 27 तासांपासून होती ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या गंभीर परिस्थितीचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतुकीवर झाला. तसेच पुण्यातील स्वारगेट येथील बस डेपोमधून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बस सेवा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला असून स्वारगेट परिसरात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. अपघातग्रस्त टँकर हटवण्याचे आणि मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कधी पूर्णपणे पूर्ववत होईल याबाबत सर्वांना काळजी लागली होती. या अपघातानंतर प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि प्रवासापूर्वी वाहतूक स्थितीची माहिती घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.