Raj Thackeray On EC: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करताना निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निर्माण झालेल्या वादग्रस्त प्रसंगावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील त्रुटींबाबत विचारलेल्या प्रश्नांना आयोगाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ठाकरे यांनी आयोगावर थेट निशाणा साधला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. या घोषणेनंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
आयोगाचा उपयोग काय? राज ठाकरेंचा सवाल
दरम्यान, पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांना दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील गोंधळाविषयी विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट उत्तर देता आले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी तो शेअर करत कठोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आणि म्हटलं की, 'आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता 100 टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय?' असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा - EC On Maharashtra Election 2025 : महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर!; 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
राज ठाकरेंकडून पत्रकारांचे कौतुक
पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 'जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल...बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...'
हेही वाचा - Maharashtra Local Body Election : ठाकरेंच्या मोर्चानंतर आयोगाला जाग, दुबार मतदारांच्या नावापुढे 'डबल स्टार' देणार
पत्रकारांच्या प्रश्नांनी आयोगाची भंबेरी
पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारले की, शेकडो मतदारांची नावे सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर किंवा आयुक्तांच्या निवासस्थानी नोंदवली गेली आहेत. यासाठी जबाबदार कोण? त्यावर वाघमारे यांनी उत्तर दिले, मतदार यादी तयार करण्याची यंत्रणा आमच्यापासून स्वतंत्र आहे. आम्ही केवळ ती यादी स्वीकारतो आणि ठराविक तारखेपर्यंत दुरुस्त्या करतो. या उत्तराने उपस्थित पत्रकार समाधानी झाले नाहीत. अनेकांनी निवडणूक आयोगावर निष्क्रियतेचा आरोप केला.