Sanjay Raut slams Fadnavis: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपविरोधी सूर चढताना दिसतोय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटलं की, 'श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस नवी गीता लिहित आहेत'. राऊतांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ‘फिक्स’ आहे का, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, 'महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजपा नाही. भाजपा हा उपऱ्यांचा आणि शेठजींचा पक्ष आहे. त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेशी, मराठी माणसाच्या भावनांशी काहीही देणं-घेणं नाही. आम्ही ते लोक आहोत जे 106 हुतात्म्यांशी बांधिलकी ठेवून काम करतोय.'
हेही वाचा: Anti Submarine Warfare ARNALA: INS अर्नाळा’ची नौदलात दमदार एंट्री; देशातील पहिले अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट होणार कमिशन
ते पुढे म्हणाले, 'प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिष्य आहोत. महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त राष्ट्राच्या लढ्यात अनेक पक्ष एकत्र आले होते आणि तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला होता. आज पुन्हा तसेच वातावरण भाजपाने तयार केले आहे. त्यामुळे मराठी अस्मिता जपणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे.'
'सामना'मध्ये छापलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र फोटोबाबत विचारले असता, राऊत म्हणाले, 'मराठी माणूस म्हणून सगळ्यांच्याच मनात आहे की हे दोघे एकत्र यावेत. महाराष्ट्र द्रोही, ज्यांचे केंद्र दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आहे, त्यांचा पराभव करण्यासाठी ही एकजूट गरजेची आहे.'
राऊतांनी पुढे भाजपाच्या नेतृत्वावर हल्लाबोल करताना म्हटलं, '2017, 2014 किंवा 1857 साली काय घडलं याकडे आम्ही पाहत नाही. आमची भूमिका ही भविष्याकडे पाहण्याची आहे. भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र संपवण्याचं काम सुरू केलं आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि त्यांच्या संघटित यंत्रणांनी प्रशासनाचा गैरवापर करून आपली सत्ता वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.'
फडणवीस यांचं नाव घेत राऊत म्हणाले, 'त्यांचं राजकीय ज्ञान अगाध आहे, त्यामुळे ते नवी गीता लिहित आहेत. मात्र आम्ही नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्या मेहरबानीने मुख्यमंत्री झालेलो नाही. पोलिस, ईडी, सीबीआय यंत्रणा हातात असल्यामुळे कोणी सर्वेसर्वा होत नाही. आमची लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे, सत्तेसाठी नाही.'
या घणाघातानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण अधिक तापणार, यात शंका नाही. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत.