Thursday, March 12, 2026 10:52:29 PM

RCF Worker Dies: दीड महिन्यापूर्वीच रुजू झाला अन् दुपारी..., आरसीएफ कंपनीतील कामगाराच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा

या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणा तपास करत आहे.

rcf worker dies दीड महिन्यापूर्वीच रुजू झाला अन् दुपारी आरसीएफ कंपनीतील कामगाराच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा

अलिबाग: औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलिबाग येथील 'राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स' (आरसीएफ) या खत कारखान्यात गुरुवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. बॅगिंग प्लांटच्या टेरेसवर काम करत असताना तोल जाऊन पडल्याने 43 वर्षीय कामगाराला त्यांचा जीव गमवावा लागला. रामसेवक रवींद्र वर्मा असे या दुर्दैवी कामगाराचे नाव असून, त्यांच्या निधनाने कंपनी परिसरात आणि कामगार वर्गात मोठी शोककळा पसरली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्याचे रहिवासी असलेले रामसेवक वर्मा हे पोटाची खळगी भरण्यासाठी अलिबागमध्ये आले होते. अवघ्या दीड-दोन महिन्यांपूर्वीच ते लोणारे येथील संतोष म्हात्रे यांच्याकडे कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाले होते. नवे काम, नवी उमेद आणि कुटुंबासाठी काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून ते कामावर रुजू झाले खरे, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास बॅगिंग प्लांटच्या टेरेसवर काम करत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि एका क्षणात सर्व काही संपले.

टेरेसवरून खाली कोसळल्याने रामसेवक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रामसेवक यांना पाहून सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. कंपनीच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कुरुळ वसाहतीतील रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. मात्र या अपघातात रामसेवक यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.

हेही वाचा: T20 World Cup Abhishek Sharma : अभिषेक शर्मा गंभीरच्या रांगेत; तिसऱ्यांदा अभिषेक शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेनंतर आरसीएफमधील औद्योगिक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. उंच ठिकाणी काम करताना आवश्यक असलेले सेफ्टी बेल्ट, जाळी किंवा इतर सुरक्षा साधने तिथे उपलब्ध होती का? कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. चेतन चंद्रकांत घरत यांनी या घटनेबाबत पोलीस ठाण्यात रीतसर माहिती दिली असून, पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

कामगार वर्गात हळहळ आणि संताप

एका निष्पाप कामगाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कामगार संघटना आणि स्थानिक मजुरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या जीवाशी असा खेळ का होतो, असा सवाल आता विचारला जात आहे. रामसेवक यांच्या पश्चात त्यांच्या मूळ गावी असलेल्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परप्रांतातून आलेल्या या कष्टकऱ्याचा असा शेवट सर्वांच्याच काळजाला चटका लावून जाणारा ठरला आहे.

हेही वाचा: Indian Student Attacked: रशियात भारतीय विद्यार्थ्यांवर भीषण चाकू हल्ला; चौघे जखमी, कोण आहे तो 15 वर्षांचा हल्लेखोर?


सम्बन्धित सामग्री