जळगाव : मेहरूण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीत दुचाकी पडून 37 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवल अर्जुन सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. नवल सोनवणे हे दुचाकीवरून जात असताना नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीचे काम अपूर्ण असल्याने त्यांना गटारीचा अंदाज आला नाही. इशारा फलकही नसल्याने दुचाकीसह ते गटारीत कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या मुळे मक्तेदारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शेतातील काम आटोपून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेने रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नवल सोनवणे हे रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे पत्नी, आई, मुलगा आणि मुलीसह राहत होते. शेतातील काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना मेहरुण बगीचा परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटच्या गटारीच्या कामाजवळ त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. यावेळी दुचाकीसह ते गटारीत पडल्याने गंभीर जखमी झाले. दुर्घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या आकस्मिक घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.