पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सध्या टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्यावर थेट आरोप करत हल्लाबोल केला आहे.
सोशल मीडियावर एका ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडवली आहे. या क्लिपमध्ये चाकणकर यांच्या समर्थक महिलेने एका सामान्य महिलेला धमकावल्याचं बोललं जात आहे. या क्लिपनंतर रोहिणी खडसे यांनी ट्विट करत ती शेअर केली आणि चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली.
हेही वाचा: बॅनर लावून पक्ष बळकट होत नाही, गळती थांबवणं महत्त्वाचं; ठाकरे बंधू एकत्रीकरणावर शिरसाट काय म्हणाले?
खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यामुळे कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपाऱ्या देण्यात येत आहेत. महिलांना काय आता विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का?'
त्याचबरोबर रोहिणी खडसे यांनी राज्यातील महिला आयोगाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोगाच्या अध्यक्षा हव्या आहेत. सध्याच्या अध्यक्षा या आपल्या पक्षातही एका प्रमुख पदावर आहेत, त्यामुळे दोन्ही भूमिका बजावताना महिला अत्याचाराच्या प्रकरणात वेळ देता येत नसेल तर हे अन्यायकारक आहे. महिला आयोगाचं पद हे पूर्णवेळ कार्यासाठी असावं, कारण त्याचा थेट परिणाम महिलांच्या प्रश्नांवर होतो.
या सर्व पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एका स्वतंत्र आणि पूर्णवेळ लक्ष देऊ शकणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करावी.