Sanjay Shirsat: राजकारणात सध्या पुन्हा एकदा ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर महायुतीचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'ते दोघं एकत्र आले तर आम्ही स्वागतच करू. मात्र यामध्ये विस्तव घालणारे बाकी लोक आहेत, त्यामुळे हे एकत्र येणे केवळ चर्चेपुरतेच मर्यादित राहणार आहे.'
संजय शिरसाट यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, 'संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे उबाठा अनुभव आहे. 2019 मध्ये आम्ही युती करून लढलो होतो, मात्र त्यांची महत्वाकांक्षा वाढली आणि त्यांनी युती तोडली. आता ते पक्षही त्यांना सोडून गेला आहे. त्यामुळे त्यांची अवस्था सरपटणाऱ्या प्राण्यांसारखी झाली आहे.'
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, 'या निवडणुका निवडणूक आयोग घेतो, संजय राऊत यांना कदाचित याची माहिती नसेल. आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढणार आहोत. उबाठा कसे लढतील, तेच पाहायचे.'
हेही वाचा:संजय राऊतांनी युतीबाबत कोणत्या ज्योतिषाला विचारलं?; गुलाबराव पाटील यांचा खोचक सवाल
शिवसेनेतील अंतर्गत बॅनरबाजीवर भाष्य करताना त्यांनी म्हटले, 'बॅनर लावून पक्ष बळकट होत नाहीत. त्याऐवजी गळती थांबवणे महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांना विचारले पाहिजे, फक्त बैठक घेऊन काही होत नाही. गट-तट निर्माण झाले आहेत आणि काही जण MIM सोबत जाण्याच्या विचारात आहेत.'
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, 'महिला आयोगाने सक्षम काम करावे. याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील, त्यामुळे मी अधिक बोलणार नाही.'
छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदावरूनही त्यांनी भाष्य केले. 'भुजबळ हे कायम सस्पेन्स ठेवतात. त्यांना भाजपकडून राज्यसभा ऑफर होती असे आम्हीही ऐकले होते. पण त्यांनी निर्णय घेतला नाही, म्हणूनच आज ते मंत्री आहेत. आता ते मंत्री झाले आहेत तर त्यांनी कामावर लक्ष द्यावे.'
संजय राऊत यांच्या 'मुंबई कोण गिळणार?' या वक्तव्यावर टीका करत शिरसाट म्हणाले, 'लोक आता या डोक्याला फिरणाऱ्यांना कंटाळले आहेत. अशा बेताल वक्तव्यांचा काही अर्थ नाही. मुंबईचे महत्व वाढले आहे, कुणीही तिला 'गिळू' शकत नाही.'
संभाजीनगरमधील पोलिस विभागात काही भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 'दरोड्यांच्या प्रकरणात काही पोलिसांचाही सहभाग असल्याचे मला समजले असून, मी यासंदर्भात आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.'
तसेच कामगार विभागातील संसार उपयोगी वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, 'बोगस याद्यांद्वारे घोटाळा करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली जाईल.'
शेवटी, ठाकरे बंधू एकत्र येणार का, यावर पुन्हा बोलताना संजय शिरसाट म्हणाले, 'ते एकत्र येतील तर आम्ही स्वागत करू. पण यामध्ये विघ्नसंतोषी लोक आहेत. त्यामुळे आजही हे सर्व केवळ चर्चा आहे, प्रत्यक्षात येणे कठीण आहे.'