Wednesday, June 18, 2025 03:22:02 PM

संजय राऊतांनी युतीबाबत कोणत्या ज्योतिषाला विचारलं?; गुलाबराव पाटील यांचा खोचक सवाल

गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहिण योजना, युतीची शक्यता, मंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि निवडणूकांवर परखड मत मांडत संजय राऊतांवर खोचक टीका केली.

संजय राऊतांनी युतीबाबत कोणत्या ज्योतिषाला विचारलं गुलाबराव पाटील यांचा खोचक सवाल

जळगांव: राज्यातील राजकीय घडामोडी आणि योजनांबाबत सुरु असलेल्या वादांवर जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे. आदिवासी विभागाच्या योजनांसाठी असलेल्या निधीबाबत त्यांनी स्पष्ट केलं की, 'लाडकी बहिण' योजनेसाठी निधी वळवण्याचा निर्णय हा पूर्णतः वित्तमंत्र्यांच्या अधिकारात येतो. त्याचा अर्थ हा नाही की मूळ योजना बंद होईल. ही एक तात्पुरती व्यवस्था आहे, ज्यामुळे दोन्ही योजना वेळेवर राबवता येतील, असेही ते म्हणाले.

त्याचबरोबर संजय राऊत यांच्या मनसेसोबतच्या युतीच्या विधानावर टीका करताना त्यांनी सांगितले की, 'संजय राऊत हे दिलसे बोलले का, हेच मुळात महत्त्वाचं आहे. कारण ते ना दिलसे बोलतात ना मनसे.' त्यांनी राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व न देण्याचा सल्ला दिला आणि पुढे म्हणाले की, 'भाऊबंदकी म्हणून हे पक्ष एकत्र यावेत, असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. मात्र त्यांच्यात फूट पडावी, यासाठी अनेकजण टपून बसले आहेत.'

हेही वाचा: सिंधुदुर्गातील तरुणांना जिल्ह्यातच नोकरी; मंत्री गोगावले यांचा पुढाकार

पुढे बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या भविष्यात मनसे, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील या दाव्यावर खोचक टिप्पणी करत म्हटलं की, 'राऊतांनी कोणत्या ज्योतिषाला विचारलं आहे, हे त्यांनाच विचारावं लागेल.'

छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या नेत्यांचं महत्त्व अधोरेखित केलं. 'देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठिंशिवाय कोणालाही मंत्रीपद मिळत नाही. मलाही त्यांच्यामुळेच मंत्रीपद मिळालं,' असं त्यांनी कबूल केलं.

नाशिकच्या पालकमंत्री पदावर झालेल्या दाव्यांवर त्यांनी सांगितले की, 'या विषयाचा निर्णय वरच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय नेत्यांचाच राहणार आहे.'

मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाने 100 जागा लढवण्याच्या दाव्यावर त्यांनी आपली निष्ठा स्पष्ट करत म्हटलं, 'नेतृत्व जो दावा करेल, त्यामागे आम्ही उभे राहतो. महायुतीच मुंबई महापालिका ताब्यात घेईल, यात शंका नाही.'

या विधानांमधून गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं की ते सरकारच्या आणि महायुतीच्या भूमिकेच्या पूर्णपणे पाठीशी आहेत. योजनांची अंमलबजावणी, युतीचे समीकरण, मंत्रीपदांची वाटणी आणि स्थानिक निवडणुका याबाबत त्यांनी दिलेली मतं सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत.


सम्बन्धित सामग्री