पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, वैष्णवी हगवणे यांच्याकडून महिला आयोगाला कोणतीही तक्रार मिळालेली नव्हती. मात्र, संबंधित प्रकरणाशी संबंधित इतर सदस्यांच्या तक्रारी मिळताच आयोगाने तात्काळ कारवाई केली होती.
चाकणकर म्हणाल्या, '6 मे रोजी मयुरी हगवणे यांचे बंधू मेघराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती. त्यानुसार आयोगाने लगेचच 7 मे रोजी बावधन पोलीस ठाण्याला पत्र पाठवले आणि कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याच दिवशी या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला.'तसेच, करिश्मा हगवणे यांनीही 6 मे रोजी आयोगाकडे मयुरी हगवणेविरोधात तक्रार दाखल केली होती. यावरही आयोगाने 6 मे रोजी पोलीस ठाण्याला पत्र देऊन त्यांच्या म्हणण्याचा अहवाल मागवला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील दोन भिन्न बाजूंकडून क्रॉस तक्रारी करण्यात आल्या होत्या, हे विशेष.
हेही वाचा: 'रुपाली चाकणकरांना पदावरून हटवा' ; रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी
'या तक्रारींची गंभीर दखल घेऊन आयोगाने 24 तासांच्या आत संबंधित पोलीस स्टेशनला पत्र पाठवून एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. त्यामुळे महिला आयोगाची भूमिका ही सक्रिय आणि तत्पर होती, असा दावा आम्ही करतो,' असे चाकणकर यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर वैष्णवी हगवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, परंतु त्या आधी त्यांच्या कडून महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार आली नव्हती, हे अधोरेखित करत चाकणकर म्हणाल्या, 'आमच्याकडे तक्रार आली असती, तर निश्चितच वेळीच हस्तक्षेप केला असता. मात्र, आम्ही संबंधित प्रकरणाच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.'
राजकीय आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, 'महिला आयोग हे एक स्वतंत्र आणि कायदेशीर संस्था आहे. आमच्या कामकाजात कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला जागा नाही. आम्ही महिलांना न्याय मिळावा यासाठी कटीबद्ध आहोत.'
या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाही, महिला आयोगाने केलेल्या वेळेवरच्या कारवाईचा दाखला देत चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता या प्रकरणातील पोलिसी तपास आणि आयोगाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.