महायुतीमधील जागावाटपाच्या घडामोडींनंतर पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार सचिन सानप यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असावा, या भूमिकेतून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे सचिन सानप यांनी स्पष्ट केले आहे. सानप यांच्या या निर्णयामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘ही बंडखोरी नाही, शिक्षकांचा अधिकार’
आपली उमेदवारी ही बंडखोरी नसल्याचे स्पष्ट करत सचिन सानप म्हणाले, “ही बंडखोरी नाही, हा शिक्षकांचा अधिकार आहे. शिक्षकांना उमेदवारी मिळाली पाहिजे होती.” पुणे जिल्ह्यात संबंधित पक्षाला एकही शिक्षक उमेदवार मिळाला नाही, याची खंत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“शिक्षकांचा आवाज बनून या निवडणुकीत मी उतरलो आहे,” अशी भूमिका सानप यांनी मांडली. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘कोण शिक्षक आणि कोण नाही, हे शिक्षकांना माहीत’
दरम्यान, इतर उमेदवारांबाबत कोणतेही मत व्यक्त करणार नसल्याचेही सानप यांनी स्पष्ट केले. कोण शिक्षक आहे आणि कोण नाही, हे संबंधित संस्था, शिक्षण क्षेत्र आणि शिक्षक समुदायाला चांगल्या प्रकारे माहीत असल्याचे ते म्हणाले.
आपल्या भूमिकेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत कोणताही अनादर करण्याचा हेतू नसल्याचे सांगताना सानप यांनी वरिष्ठांची दिलगिरी व्यक्त केली. “मी कोणत्याही नेत्यांबद्दल बोलण्यासाठी एवढा मोठा नाही. वरिष्ठांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो,” असे ते म्हणाले.
मात्र, शिक्षकांच्या या निवडणुकीत शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवण्याचा आपला निर्धार कायम असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपानंतर पुणे शिक्षक मतदारसंघात आता भाजपच्या अधिकृत उमेदवारासोबत सचिन सानप यांच्या अपक्ष उमेदवारीची लढत रंगण्याची शक्यता आहे.