Sandeep Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात 'राऊत' बंधूंचा दबदबा आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्यानंतर आता कुटुंबातील तिसरे बंधू संदीप (आप्पा) राऊत यांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC) ते नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहेत.
एकाच कुटुंबात 3 लोकप्रतिनिधी?
संदीप राऊत यांचा विजय झाल्यास एकाच कुटुंबातील तिन्ही भाऊ वेगवेगळ्या सभागृहांचे सदस्य असण्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळेल. संजय राऊत हे राज्यसभा खासदार (संसद), सुनील राऊत आमदार, विक्रोळी विधानसभा (विधिमंडळ), संदीप राऊत हे नगरसेवक (महापालिका – इच्छुक).
भांडुपमधील वॉर्ड 111 वरून महाविकास आघाडीत पेच
संदीप राऊत यांनी विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील भांडुप पूर्व (वॉर्ड क्रमांक 111) मधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, याच जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ याच वॉर्डसाठी आग्रही आहेत. संदीप राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली दावेदारी जाहीर केल्यामुळे आता या जागेवरून ठाकरे आणि पवार गटात पेच निर्माण झाला आहे.
ठाकरे-मनसे युतीचे नवे समीकरण
यावेळची मुंबई महापालिका निवडणूक विशेष ठरणार आहे, कारण शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात युती झाली आहे. या दोन्ही पक्षांचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नसले तरी, संदीप राऊत यांच्या उमेदवारीमुळे भांडुपमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.