मुंबई : शिउबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी होणार आहे. मात्र त्याआधीच हे पुस्तक वादात सापडले आहे. राऊतांनी या पुस्तकातून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी, शाहांना मदत केली. पवारांमुळे मोदींची अटक टळली असा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केला आहे. यावर सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते जोरादार टीका करत आहेत.
राऊतांनी पुस्तकातून केलेल्या खुलाशानंतर महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुस्तकाचे नाव बद्दलण्याची गरज आहे. नरकातला राऊत असं पुस्तकाचं नाव ठेवावं. यासंदर्भात राऊत यांना पत्रही पाठवणार असल्याचं म्हणत बावनकुळे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी नरकातील स्वर्गापेक्षा गटारातील अर्क लिहावं अशी जोरदार टीका भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊतांनी पुस्तकाबदद्ल विचारले असता, कथा, कादंबरी आणि बालवाङ्मय वाचण्याचं वय नाही आणि राऊतांचं सोडून द्या. ते कोण आहेत. मोठे नेते आहेत का? असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी राऊतांना लगावला आहे.
हेही वाचा : मणिपूरमधील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा; शस्त्रे आणि दारूगोळा जप्त
संजय राऊत यांना आता कोणी महत्व देत नाहीत. त्यामुळे त्यांनी पुस्तकात बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांना मदत केल्याचा उल्लेख केला असला तर चांगलीच गोष्ट आहे. आम्ही आजही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. काँग्रेस मांडीवर बसलेल्या सेनेसोबत नाही, आम्ही आजही बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहोत असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत. तर संजय राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील. राऊतांनी तुरुंगात असताना उद्धव ठाकरेंची लायकी काढली होती असा पलटवार मंत्री नितेश राणेंनी केला आहे. राऊतांनी नरकातला स्वर्ग पुस्तक लिहले. त्यांना लिहण्याचा छंद आहे ही चांगली गोष्ट आहे. पुस्तकात वास्तविकता मांडायला पाहिजे होती. मात्र जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.
नरकातील स्वर्ग पुस्तकातील खळबळजनक दावे
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं. मोदी विरुद्ध केंद्र असा संघर्ष सुरु होता. गोध्राकांडात सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे होता. अनेक पोलीस अधिकारी, अमित शाहांना तुरुंगात जावं लागलं होतं. असा दावा राऊतांनी पुस्तकातून केला आहे. चौकशीची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत येऊन पोहोचली होती. मोदींना अटक होईल असं वातावरण निर्माण झालं होतं. लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांच्या भूमिकेला अनेकांची मूकसंमती मिळाली आणि मोदींची अटक टळली असा गौप्यस्फोट खासदार राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' पुस्तकातून केला आहे.