Sanjay Raut on Mumbai Mayor Post : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणूकीवरून आणि राज्याच्या राजकारणावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्यावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
राऊत यांच्या मते, भाजप आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतील समित्यांच्या वाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही कोणती समिती कोणाकडे असावी, यावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळेच महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांना सभागृहात येण्यापासून रोखणे हे लोकशाहीसाठी घातक असून, केवळ सत्तेच्या वाटपासाठी ही दिरंगाई केली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते पदावरून 'हलकटपणा'चा आरोप
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदासाठी आमदारांची संख्या निश्चित करणारा नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. हे शिवसेनेला आणि विरोधी पक्षांना या पदापासून दूर ठेवण्याचे 'घृणास्पद' कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विधान परिषद आणि विधानसभेत विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला राऊत यांनी थेट 'हलकटपणा' असे संबोधले आहे. अशा कृत्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चंद्रपूर महापालिका आणि काँग्रेससोबतची जवळीक
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना राऊत यांनी स्पष्ट केले की, अपक्ष आमदार जोरगेवार हे भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत. मात्र, शिवसेनेची विजय वडेट्टीवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच अंतिम निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. भाजपसोबत जाण्याच्या चर्चा केवळ हवेत सोडलेले 'तीर' असून, सध्या तरी भाजपसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतः मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Maharashtra Cabinet Reshuffle: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी; मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत
प्रोटोकॉल आणि राहुल गांधींचा अपमान
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना मागच्या रांगेत बसवल्यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ज्यांनी देशासाठी त्याग आणि बलिदान दिले, अशा गांधी कुटुंबातील नेत्याचा आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा हा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. मंत्र्यांचे कुटुंबीय पहिल्या रांगेत बसलेले असताना विरोधी पक्षनेत्यांना मागच्या रांगेत बसवून भाजप प्रोटोकॉलच्या गप्पा कशा मारू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकशाही मूल्यांची पायमल्ली
संजय राऊत यांनी आपल्या संवादाचा समारोप करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे मोदी-शहांचे 'चेले' असल्याने त्यांच्याकडून लोकशाहीच्या सन्मानाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक सोहळ्यात विरोधकांना सन्मान दिला जात नसेल, तर राज्यातही तेच चित्र पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आणि शिंदे गटाचे राजकारण हे केवळ विरोधकांना संपवण्याच्या हेतूने सुरू असून, जनतेने हे ओळखावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा - Gram Panchayat Election: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर; 14 हजार ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती होणार