साताऱ्यातील 7789 शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित; ‘या’ कारणामुळे अडकली मदत

प्रशासकीय माहितीनुसार, 5,052 शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अपूर्ण आहे, तर 2,737 शेतकऱ्यांकडे शासनाचा डिजिटल 'ॲग्री स्टॅक फार्मर आयडी' उपलब्ध नाही. त्यामुळे प्रणालीद्वारे ही रक्कम रोखून धरण्यात आली आहे.
साताऱ्यातील 7789 शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित; ‘या’ कारणामुळे अडकली मदत
Satara farmer loan waiver

सातारा जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकूण 37,159 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 29,705 शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 219.90 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित 7,789 पात्र शेतकरी केवळ डिजिटल आणि तांत्रिक त्रुटींमुळे अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासकीय माहितीनुसार, 5,052 शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अपूर्ण आहे, तर 2,737 शेतकऱ्यांकडे शासनाचा डिजिटल ‘ॲग्री स्टॅक फार्मर आयडी’ उपलब्ध नाही. त्यामुळे प्रणालीद्वारे ही रक्कम रोखून धरण्यात आली आहे.

बँक खाते लिंक नसणे आणि इंटरनेट अभावामुळे प्रक्रिया मंदावली

आधार प्रमाणीकरण रखडण्यामागे अनेक स्थानिक समस्या समोर आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी बँक खाते किंवा मोबाईल क्रमांक जोडलेला नाही. तसेच ग्रामीण भागातील इंटरनेट टंचाई आणि बायोमेट्रिक ठसे न जुळणे यांमुळे प्रमाणीकरणाचे काम रखडले आहे. या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नजीकच्या सीएससी (CSC) केंद्रात जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी आणि कृषी सहाय्यकांच्या मदतीने फार्मर आयडी तयार करावा, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

हेही वाचा – सुट्टे मसाले विकताना आता करावे लागणार ‘हे’ महत्त्वाचे काम! तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ग्राहकांनी खरेदीपूर्वी नक्की पाहा

नियमित कर्ज भरणारे शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत

दुसरीकडे, थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप वितरीत करण्यात आलेले नाही. दुष्काळ आणि नापिकीचा सामना करूनही वेळेवर हप्ते भरणाऱ्यांवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version