Sanjay Raut's 'X' post: राज्यातील हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या दोन पक्षांनी एकत्र येत 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. हा मोर्चा राज्याच्या राजकारणात मोठा वळण देणारा ठरेल, अशी चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीविषयी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आता हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
राज्य सरकारने 16 आणि 17 एप्रिल रोजी जारी केलेले हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्रिभाषा सूत्रांतर्गत हिंदीचा शिक्षणातील वापर कोणत्या वर्गापासून करायचा, आणि विद्यार्थ्यांना कोणते पर्याय उपलब्ध करायचे, याबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीचे नेतृत्व शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव करणार असून, लवकरच समितीचे इतर सदस्य जाहीर करण्यात येणार आहेत.
हेही वाचा: साई संस्थानमध्ये बोगस सुरक्षारक्षक भरती?
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाजमाध्यम 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरून प्रतिक्रिया देताना सांगितले,
'हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, 5 जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही; पण.. ठाकरे हाच ब्रँड! फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय. छान', असे म्हटले आहे.
हा संपूर्ण प्रकार पाहता, ठाकरे आणि मनसे या दोन राजकीय विरोधकांचा एकत्रित मोर्चा होण्याची शक्यता ही सरकारसाठी दबाव निर्माण करणारी ठरली होती. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय तात्पुरता शांतता निर्माण करणारा असला, तरी आगामी काळात समितीचा अहवाल आणि त्यानंतर होणारे निर्णय याकडे राज्यातील शिक्षक, पालक आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.