शिर्डी: शिर्डीच्या साई संस्थानमध्ये बोगस सुरक्षारक्षक भरती झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, संस्थेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या संस्थानमध्ये माजी सैनिकांच्या नावाने सुरक्षारक्षक भरती केल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र आता या भरतीतील काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे अधिकृत कागदपत्रच नसल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे.
सध्या साई संस्थानमध्ये कंत्राटी पद्धतीने 84 पेक्षा अधिक सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. यातील अनेकांनी स्वत:ला माजी सैनिक म्हणून सादर केले होते. तथापि, जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू केली असून काही जणांची पात्रता संशयास्पद असल्याचे आढळून आले आहे. समितीने पुढील चार ते पाच दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा: आता मोबाईलद्वारे मतदानाची नांदी बिहारमध्ये स्थानिक निवडणुकीत वापर
विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाल्यामुळे साई संस्थानने संबंधित कंत्राटदार कंपनीला पत्र काढून कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्ते अशोक दूशिंग यांनीही प्रश्न उपस्थित करत या भरती प्रक्रियेतील अनियमिततेचा निषेध केला आहे.
हा प्रकार केवळ एक नोकरभरती घोटाळा नसून, माजी सैनिकांच्या सन्मानाशी संबंधित असल्यामुळे अधिक संवेदनशील मानला जातो. जर या भरती प्रक्रियेत बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळाल्या असतील, तर हे केवळ कायदेशीर गुन्हा नसून, देशसेवेचा अपमान आहे.आता सर्वांचे लक्ष जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे लागले आहे. या अहवालानंतरच साई संस्थान पुढील पावले उचलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे संस्थेच्या निर्णय प्रक्रियेवर आणि कंत्राटदार कंपनीच्या जबाबदारीवरही प्रश्न उभे राहत आहेत.