सोलापूर: सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे ऑनलाइन पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने महिलांचा गुपचुप व्हिडिओ काढत विनयभंग केला. आरोपी सर्फराज नदाफ (रा. नवी जिंदगी, सोलापूर) याच्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, सर्फराज तिच्या घरी पार्सल घेऊन आला होता. पार्सल देताना त्याने लपून तिचा व्हिडिओ काढला. महिलेच्या लक्षात आल्यावर तिने तत्काळ सर्फराजचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यातील सामग्री पाहून हादरली. मोबाईलमध्ये अनेक महिलांचे गुप्तपणे काढलेले अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ आढळून आले.
हेही वाचा: बडतर्फ जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या; कोल्हापुरात खून करून आरोपी सोलापूर पोलिसांकडे हजर
त्यानंतर पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतलं आणि सर्फराजला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून, सर्फराजने आणखी किती महिलांचे व्हिडिओ तयार केले आहेत आणि त्यांचा कोणत्या प्रकारे गैरवापर झाला आहे, याची चौकशी सुरु आहे.
या प्रकरणावर हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असा आरोप केला की, हे केवळ एक वैयक्तिक कृत्य नसून 'फोटो मॉर्फ रॅकेट'चे हे एक उदाहरण असू शकते. अनेक महिलांचे फोटो व व्हिडिओ मॉर्फ करून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. पोलिसांनी या प्रकारचा सखोल तपास करून अशा रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा: शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील खड्ड्यामुळे रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचे तीव्र संताप
या घटनेनंतर नागरिकांनी ऑनलाइन वस्तू मागवताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. डिलिव्हरी करताना अनोळखी व्यक्तींकडून अस्वस्थ करणारे वर्तन झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही घटना गंभीर असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक करून योग्य पावले उचलली आहेत.
सध्या सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू असून महिलांनी ऑनलाइन व्यवहार करताना व घरात डिलिव्हरी स्वीकारताना सतर्क राहण्याचे आवाहन नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.