सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात विविध गणेश मंडळांकडून आकर्षक देखावे आणि सामाजिक संदेश देणारे चित्ररथ साकारण्यात आले आहेत. यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत शहरातील पंचमुखी कला, क्रीडा गणेशोत्सव मंडळाने अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्याचा गौरव करणारा विशेष चित्ररथ साकारला आहे. या चित्ररथातून भेसळ आणि औषधांच्या किमतीबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
या चित्ररथामध्ये तुकाराम मुंडे यांची प्रतिमा साकारण्यात आली असून, अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे विविध पैलू दाखवण्यात आले आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांमधील भेसळ तसेच औषधांच्या विक्रीशी संबंधित बाबींवर कारवाई करून नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या कामाचा या माध्यमातून गौरव करण्यात आला.
तुकाराम मुंडे यांच्या कार्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भेसळीच्या समस्येबाबत अधिक जागरूकता निर्माण झाल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच काही औषधे तुलनेने कमी किमतीत उपलब्ध असताना त्यांची विक्री अधिक किमतीत कशी केली जाते, यासंदर्भातील प्रश्नही त्यांच्या कारवाईमुळे चर्चेत आल्याचे मंडळाकडून नमूद करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक वातावरण निर्माण न करता समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि प्रशासनाच्या उपक्रमांचा गौरव करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे असल्याची भूमिका पंचमुखी कला, क्रीडा गणेशोत्सव मंडळाने व्यक्त केली.
Pune: जयघोष, ढोल-ताशांचा निनाद अन् भक्तीचा उत्साह! पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन संपन्न
“तुकाराम मुंडे साहेब आणि त्यांच्या विभागाकडून नागरिकांच्या हितासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने यंदा हा विशेष देखावा साकारला आहे,” अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सादर करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचा मंडळाचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.