ST महामंडळाचा प्रवाशांना मोठा दिलासा; ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचे पास आता थेट मोबाईलवर उपलब्ध

प्रवाशांमध्ये कमालीची लोकप्रिय असलेली 'आवडेल तेथे प्रवास' या योजनेअंतर्गत मिळणारे 4 दिवस आणि 7 दिवसांचे पास आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
MSRTC pass
MSRTC pass

ST Bus Online Pass: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांमध्ये कमालीची लोकप्रिय असलेली ‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत मिळणारे 4 दिवस आणि 7 दिवसांचे पास आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे आता प्रवाशांना पास मिळवण्यासाठी एसटीच्या बसस्थानकांवर किंवा आगारांत तासनतास लांबच लांब रांगेत उभे राहण्याची मुळीच गरज भासणार नाही. नागरिक घरबसल्या अवघ्या 2 मिनिटांत आपले पास ऑनलाइन मिळवू शकणार आहेत.

अधिकृत ॲप अन् वेबसाईटवरून बुकिंग

एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) तसेच मोबाईल ॲपवर ही नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना त्यांच्या नियोजित प्रवासानुसार हे पास सहज खरेदी करता येतील. प्रवासादरम्यान पासची कागदी प्रिंट सोबत बाळगणे आता बंधनकारक असणार नाही. मोबाईलमध्ये सेव्ह केलेली पीडीएफ (PDF) फाईल किंवा डिजिटल प्रत दाखवूनही प्रवासी आपला प्रवास अत्यंत सुकरपणे पूर्ण करू शकतात. विशेषतः सुट्टीचा काळ, सण-उत्सव आणि कौटुंबिक सहलींच्या वेळी या ऑनलाईन सुविधेचा हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा – दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे दर

क्यूआर कोडद्वारे होणार तपासणी

ऑनलाइन मिळणाऱ्या प्रत्येक पासवर सुरक्षेच्या दृष्टीने एक विशेष क्यूआर (QR) कोड देण्यात आला आहे. प्रवासाच्या वेळी एसटीचे तिकीट तपासक किंवा अधिकारी हा कोड स्कॅन करून पासची त्वरित पडताळणी करतील. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये पासची डिजिटल प्रत तयार ठेवणे आवश्यक आहे.

या निर्णयामुळे प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे झाले असून, एसटी महामंडळाने डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक अत्याधुनिक आणि प्रवासीधार्जिणी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version