Sunil Tatkare Statement on Prashant Kishor: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडली. प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात किंवा त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगत तटकरेंनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
'एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय सर्वांचा; पक्षात दोन मतप्रवाह नाहीत'
पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे यांनी पक्षांतर्गत मतभेदाचे सर्व दावे फेटाळून लावले. ते म्हणाले की, जर प्रशांत किशोर यांची सल्लागार म्हणून अधिकृत नियुक्ती झाली असती, तर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला नक्कीच कल्पना असती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होण्याचा निर्णय हा संपूर्ण नेतृत्वाने एकत्रितपणे व उत्साहाने घेतला होता. हा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम यशामध्ये दिसून आला, त्यामुळे पक्षात दोन वेगळे गट किंवा मतप्रवाह असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
'41 वर्षांचा राजकीय अनुभव; मला रणनीतीकाराची गरज नाही'
माझ्याबद्दल पक्षात नाराजी असल्याच्या बातम्या तथ्यहीन असून मीडियाचे सूत्र काय सांगतात, यापेक्षा मला माझे राजकीय स्थान पूर्णपणे ठाऊक आहे, असा टोला तटकरेंनी लगावला. आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाचा दाखला देत ते म्हणाले की, 1985 मध्ये काँग्रेसचा रोहा तालुका सरचिटणीस म्हणून मी राजकारणाला सुरुवात केली आणि त्याच वर्षी विधानसभेचे तिकीट मिळवले. सलग 41 वर्षे अतिसंवेदनशील रायगड जिल्ह्यात व राज्यात सक्रिय राहून मी काम केले आहे. अख्खा महाराष्ट्र पालथा घालणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये माझा समावेश असून राज्यातील सर्व मतदारसंघांची मला खडान् खडा माहिती आहे, त्यामुळे रणनीतीकारांवर अवलंबून राहण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर राजकीय चर्चेला उधाण
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी प्रशांत किशोर यांची मदत घेतली जात असल्याचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र, सुनील तटकरे यांनी दिलेल्या या रोखठोक प्रतिक्रियेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबत आणि वरिष्ठ नेत्यांमधील समन्वयाबाबत नवी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.