सोलापूर: सोलापूर येथील मेफेड्रोनच्या (एमडी) कारखान्यावर मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षी केलेल्या कारवाईत 256 कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. या प्रकरणातील फरार आरोपी ताहेर सलीम डोला याला युनायटेड अरब अमिराती(यूएई) येथून भारतात आणण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) इंटरपोल विभागाला यश आले आहे. आरोपीविरोधात रेड कॉर्नर नोटीस देण्यात आली होती. त्याच्या आधारवर त्याला अबुधाबीमध्ये पकडण्यात आले होते. सीबीआयच्या इंटरनॅशनल पोलिस कोऑपरेशन विभागाने अबूधाबी येथील नॅशनल सेंट्रल ब्युरोच्या मदतीने ही कारवाई केली.
ताहेर सलीम डोला याला गुरूवारी दुबईहून विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. इंटरपोलमार्फत केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर त्याला यूएईमध्ये शोधून काढण्यात आले होते. कुर्ला परिसरातून गुन्हे शाखेच्या कक्ष-8 च्या पोलिसांनी 15 फेब्रुवारी,2024 रोजी एका महिलेला 641 ग्रॅम एमडीसह पकडले होते. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मिरा रोड येथे छापा टाकून तीन किलो एमडी जप्त केले होते. त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे महिन्याभरानंतर सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावच्या शिवारात एमडी निर्माण करण्याचा कारखान्यावर छापा टाकला होता. यावेळी 126 किलो एमडी जप्त करण्यात आला होता.
हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात
या कारवाईत आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील तिघांना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीत ताहेर सलीम डोला परदेशात वास्तव्यास असतानाच हा कारखाना चालवत होता, असे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच शोध घेण्यात आला पण आरोपी परदेशात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार इंटरपोलने 25 नोव्हेंबर 2024 ला ताहिर डोला विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. अबूधाबी येथील अबुधाबी येथील नॅशनल सेंट्रल ब्युरो या यंत्रणेने त्याला 27 जानेवारी रोजी पकडले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्यामार्फत यूएईकडे प्रत्यर्पणाची अधिकृत मागणी केली होती. त्यानंतर गुरूवारी आरोपीला भारतात आणण्यात आले.
हेही वाचा:गोंदिया शासकीय आश्रम शाळेतील नर्स भरतीत मोठा घोटाळा; स्थानिक उमेदवारांचा आरोप
इंटरपोलमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या रेड कॉर्नर नोटीस सर्व देशांतील यंत्रणांना दिल्या जातात. सीबीआय ”भारतपोल”च्या माध्यमातून देशांतर्गत समन्वय साधते. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे 100 हून अधिक फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात यश आले आहे. आरोपी ताहिर डोलाचे प्रत्यर्पण अमलीपदार्थ विरोधी मोहिमेतील भारताचे मोठे यश मानले जाते. आरोपीचे वडील सलीम डोला हे देखील अंमली पदार्थ तस्करीच्या अनेक गुन्ह्यांत सहभागी होते. ताहिर मोठ्याप्रमाणात एमडीची निर्मिती करत होता. त्याच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या विविध कारखान्यांमध्ये 10 दिवसांमध्ये 200 किलो एमडीची निर्मिती होत होती. दोन वर्षांपासून तो एमडी निर्मितीत सक्रिय होता. आरोपीविरोधात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत चार कोटींची रोख रक्कमही हस्तगत केली होती.