Teachers Protest: राज्यभरातील शिक्षकांसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी उद्या राज्यभर 'शाळा बंद' आंदोलन करण्यात येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने या आंदोलनाची घोषणा केली असून मोठ्या प्रमाणावर शिक्षक सामूहिक रजेवर जाणार आहेत. त्यामुळे अनेक शासकीय, जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमधील नियमित अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांमध्ये नाराजी
शिक्षकांवर सातत्याने वाढणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून निवडणूक कामे, विविध शासकीय सर्वेक्षणे आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याची शिक्षकांची भूमिका आहे. त्यामुळे अशा कामांतून शिक्षकांची मुक्तता करून त्यांना केवळ अध्यापनाची जबाबदारी द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
TET नियमांवरही शिक्षकांचा आक्षेप
तसेच, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भातील काही नियम आणि त्यांची सक्ती याविरोधातही शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या धोरणांमुळे अनेक शिक्षकांच्या सेवासुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी आंदोलनाच्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक आहे.
मुंबईसह राज्यभर निदर्शने
या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षक संघटनांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोरही मोर्चे व निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्या शाळांवर होणार परिणाम?
शिक्षक संघटनांच्या या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे राज्यातील शासकीय, जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमधील कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहू शकतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी संबंधित शाळांकडून सूचना जाणून घेऊनच पुढील नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.