Saturday, March 07, 2026 02:48:04 AM

Railway Train Delay: रेल्वेचा ‘लेटलतीफ’ कारभार; तेजस एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना उशिर, प्रवाशांना संताप अनावर

दादर स्थानकावरील सुविधांचा अभाव आणि विलंबाबाबत स्पष्ट सूचना न मिळाल्याने प्रवाशांचा संताप वाढला असून रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

railway train delay रेल्वेचा ‘लेटलतीफ’ कारभार तेजस एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना उशिर प्रवाशांना संताप अनावर

मुंबई : लोकल गाड्यांनंतर आता लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवारी मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस तब्बल सहा तास उशिरा धावली, तर गुरुवारी सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस पावणे तीन तास विलंबाने पोहोचल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. “वेळ पाळली तरच रेल्वेचा प्रवास सुखाचा” हे समीकरण सध्या पूर्णपणे ढासळले आहे. विलंबाबाबत आगाऊ सूचना न मिळाल्याने स्थानकावर पोहोचल्यानंतरच उशीर कळतो आणि प्रवाशांचा त्रास दुपटीने वाढतो आहे.

गुरुवारी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणारी मांडवी एक्स्प्रेस फलाटावर येण्यासच उशीर झाला. अखेर ही गाडी सुमारे 9 वाजून 45 मिनिटांनी मडगावच्या दिशेने रवाना झाली. मात्र सीएसएमटी परिसर ओलांडल्यानंतर मशीद स्थानकाजवळ काही प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढल्याने गाडी सुमारे 15 मिनिटे खोळंबली. परिणामी, एरवी सकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी दादर येथे पोहोचणारी ही गाडी सव्वा 10 वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. दादरमध्ये शेकडो प्रवासी प्रतीक्षेत असताना विलंबाबाबत स्पष्ट उद्घोषणा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण होते.

बुधवारी मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दुपारी 3 वाजून 35 मिनिटांऐवजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी दाखल झाली. प्रशासनाने वेळ रात्री 9 वाजताची घोषित केली होती. मात्र प्रत्यक्षात गाडी तासाभराने सुटली. दादर येथे रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित असलेली तेजस दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी दाखल झाली. तब्बल रात्रभर प्रवास करावा लागल्याने प्रवाशांचा संताप उफाळून आला. तेजस एक्स्प्रेसमध्ये शयनयान डबे नसल्याने रात्रभर बसून प्रवास करण्याची वेळ आली.

हेही वाचा: Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमध्ये दोन गटात गँगवॉर; जुन्या वादातून तुफान राडा, तर गोळीबारात एकाचा मृत्यू

दादर स्थानकावरील मूलभूत सुविधांचा अभाव हा आणखी एक जखमेवर मीठ चोळणारा मुद्दा ठरला. फलाटावर चहा-पाण्याचा स्टॉल नाही, स्वच्छतागृह नाही, तसेच बसण्याचीही योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागली. “रेल्वेची गाडी उशिरा आली तरी चालेल; पण प्रवाशांना माणूस म्हणून वागवा,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

यात भर म्हणजे दादर ते सीएसएमटी दरम्यान तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना बॅगा खांद्यावर घेऊन दादरवरून लोकल पकडावी लागली. “आधीच उशीर, त्यात बदलती व्यवस्था,” या दुहेरी संकटामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने विलंबाचे कारण स्पष्ट करत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा ‘वेळेवर धावणारी रेल्वे’ हा विश्वास केवळ कागदावरच उरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: India vs Namibia: भारताची स्फोटक फलंदाजी; भारताने नामिबियासमोर उभे केले 210 धावांचे महाकाय लक्ष्य


सम्बन्धित सामग्री