राज्याच्या राजकारणात सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या ऑपरेशन टायगरमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच देखील नाव असून पवनराजे प्रकरणाचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार होते. दरम्यान ते देखील शिंदेसेनेत प्रवेश करणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. अशातच ओमराजे निंबाळकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत दुपारी चार वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
गोवर्धनवाडीमध्ये होणाऱ्या बैठकीत प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मतांचा आढावा घेतल्यानंतर ओमराजे आजच आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओमराजे निंबाळकर यांनी पक्षप्रवेशावरून म्हटलं होतं की, ते त्यांच्या मतदारसंघाला भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे आज धाराशिवमध्ये होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी आज खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी तिघांमध्येही मध्यरात्री तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात मध्यरात्री आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. ओमराजे यांनी पक्षातच राहावे यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
तर दुसरीकडे, ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे गटात जाण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसून यामुळे सहा खासदारांचा गट न झाल्यास इतर खासदारांची खासदारकी धोक्यात येणार का? अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे गोवर्धनवाडी येथे होणाऱ्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून बैठकीनंतर नेमकी काय भूमिका जाहीर होते हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.