Western Freight Corridor: भारताच्या मालवाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या 'पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गाच्या' (WDFC) कामात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. जेएनपीटी ते वैतरणा या 102 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर नुकतीच यशस्वी सुरक्षा चाचणी पार पडली. या मार्गामुळे आता देशांतर्गत औद्योगिक पट्टा आणि जेएनपीटी बंदर यांमधील व्यापाराला मोठी गती मिळणार आहे.
डीएफसीसीआयएलचे (DFCCIL) व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांच्या उपस्थितीत रेल्वे कारच्या साह्याने या संपूर्ण पट्ट्याची पाहणी करण्यात आली. वैतरणा ते न्यू खारबाव या 30 किमी अंतराचे विद्युतीकरण यापूर्वीच पूर्ण झाले असून, तिथे इलेक्ट्रिक इंजिनची चाचणीही यशस्वी झाली आहे.
सध्या सिग्नलिंग आणि उर्वरित विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच हा संपूर्ण मार्ग मालवाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे सामान्य रेल्वे गाड्यांच्या मार्गावरील मालगाड्यांचा भार कमी होऊन प्रवासी गाड्यांचा वेळही वाचणार आहे.