महाराष्ट्रातील हवामानात पुढील काही दिवस मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात एकीकडे ऑक्टोबर हिटचा चटका बसत असताना हवामान खात्याकडून मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पुणे, सातारा आणि घाटमाथ्याच्या परिसरात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
अशातच येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भातील काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढणार असल्याने या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह घाटमाथा या भागातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
यावेळी 16 ते 19 दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून या जिल्ह्यात हलका मध्यमपावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात या काळात वाऱ्याचा वेग प्रतितास 40 ते 50 किमी इतका राहणार असून विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान या बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.