KDMC Election 2026 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे दोन नगरसेवक अचानक 'नॉट रिचेबल' झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित नगरसेवकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. "जर गटाची स्थापना करताना हे नगरसेवक समोर आले नाहीत, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.
नेमके प्रकरण काय?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. यादरम्यान ठाकरे गटाचे दोन महत्त्वाचे नगरसेवक पक्षाच्या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची किंवा त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आता ठाकरे गटाकडून केला जात आहे.
हेही वाचा - Sanjay Raut on BMC Mayor : भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग; शिंदेंना स्टँडिंग कमिटीत जास्त रस
संजय राऊतांचा प्रहार
या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आमचे दोन नगरसेवक सध्या संपर्कात नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, लोकशाहीत पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जागा नाही. महापालिकेत गटाची नोंदणी करताना किंवा महत्त्वाची प्रक्रिया सुरू असताना हे नगरसेवक उपस्थित राहिले नाहीत, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यांच्याविरुद्ध पक्षादेश (व्हिप) उल्लंघन आणि अपात्रतेची कायदेशीर प्रक्रिया तातडीने राबवली जाईल."
शिंदे गटावर निशाणा
कल्याण-डोंबिवलीत सत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शिंदे गटाकडून साम-दाम-दंड-भेदाचा वापर केला जात असल्याची टीका राऊतांनी केली. नगरसेवकांना प्रलोभने दाखवून फोडले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही ही परिस्थिती हाताळू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या इशारानंतर आता ते दोन 'नॉट रिचेबल' नगरसेवक परत स्वगृही परतणार की शिंदेंच्या शिवसेनेत सामील होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या राजकीय नाट्यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.