Nasrapur Case: पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि मृत्यू प्रकरणात अंतिम निकाल देत दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी 26 जून रोजी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. अंतिम निकाल जाहीर करताना न्यायमूर्तींनी आरोपीकडे पाहत, 'आता फासावर चढा,' अशा कठोर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, 65 वर्षीय आरोपीने कोणतीही भावना व्यक्त केली नाही. तो संपूर्ण सुनावणीदरम्यान मान खाली घालून शांतपणे उभा राहिला.
'दुर्मिळातील दुर्मिळ' गुन्हा; दयेची कोणतीही जागा नाही
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट' अर्थात 'दुर्मिळातील दुर्मिळ' स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले. 137 पानांच्या निकालपत्रात बच्चनसिंह प्रकरण, अशरफ अली प्रकरण आणि वसंत धुपारे विरुद्ध महाराष्ट्र सरकार यांसह 12 महत्त्वाच्या न्यायनिर्णयांचा संदर्भ देण्यात आला आहे. आरोपी हा समाजात राहण्यास अपात्र असून, त्याने केलेल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही, असे न्यायालयाने नमूद केले. अवघ्या 3 वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे आरोपीवर दया दाखवण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगत, कायद्यातील सर्वोच्च शिक्षाच त्याला सुनावण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
निकाल ऐकताच पालकांना अश्रू अनावर
घटना घडल्यानंतर आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी सातत्याने लढा देणाऱ्या पीडितेच्या आई-वडिलांना अंतिम निकाल ऐकताच अश्रू अनावर झाले. न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावताच त्यांनी कोर्टातच हंबरडा फोडला. आपल्या चिमुकलीला सहन कराव्या लागलेल्या अमानुष वेदना आठवत त्यांनी दु:खाला वाट मोकळी करून दिली. हा भावनिक क्षण पाहून न्यायालयातील उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत.
आरोपीचा बचाव फोल; पुराव्यांनी उघड केले संपूर्ण सत्य
शिक्षेपूर्वी झालेल्या सुनावणीत आरोपीने स्वतःचा बचाव करताना, मुलगी हातातून घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. तपासात आरोपीने पीडितेला खाऊचे आमिष दाखवत गोठ्यात नेले, तिच्यावर अत्याचार करून तिला गळा आवळून संपवल्याचे सिद्ध झाले. शवविच्छेदन अहवालात बालिकेच्या शरीरावर 19 जखमा असल्याचे नमूद करण्यात आले असून, मृत्यूनंतरही तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, पोलिसांनी सादर केलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर ठोस पुराव्यांमुळे आरोपीचा संपूर्ण गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.