Saturday, March 07, 2026 02:43:05 AM

Hirkani Tigress : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत 'हिरकणी'ची डरकाळी! पेंचमधल्या 'लाडो'चं थाटात आगमन

पेंचमधून आणलेली वाघीण 'लाडो' हिला कोयना अभयारण्याच्या 'कोअर' क्षेत्रात मुक्त करण्यात आले. सह्याद्रीतील गाईड्स आणि वनरक्षकांनी तिचे अत्यंत प्रेमाने 'हिरकणी' असे नामकरण केले आहे.

hirkani tigress  सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत हिरकणीची डरकाळी पेंचमधल्या लाडोचं थाटात आगमन

Hirkani Tigress in Sahyadri Mountains : पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी शनिवारचा दिवस अत्यंत भाग्याचा ठरला. मध्य प्रदेशातील पेंचच्या जंगलातून आलेल्या वाघिणीच्या एका डरकाळीने संपूर्ण कोयना परिसर दणाणून गेला आहे. 'लाडो' नावाने पेंचमध्ये ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीचे सह्याद्रीत आगमन होताच 'हिरकणी' असे नामकरण करण्यात आले असून, तिच्या आगमनाने प्रकल्पातील वाघांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे.

पेंच ते कोयना: एक थरारक प्रवास
या वाघिणीचा प्रवास एखाद्या साहसी चित्रपटासारखा राहिला. गुरुवारी सायंकाळी 5:00 वाजता मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी वनपरिक्षेत्रातून तिला पकडण्यात आले. तिथून रस्ते मार्गाने प्रवास करत तिला सह्याद्रीत आणले गेले. विशेष म्हणजे, शुक्रवारी रात्री तिला बोटीने प्रवास घडवून कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात नेण्यात आले. शनिवारी पहाटे 6:00 वाजता पशुवैद्यकीय तपासणीनंतर, तिला कोयना अभयारण्याच्या 'कोअर' क्षेत्रात पूर्णपणे मुक्त करण्यात आले. निसर्गाच्या सान्निध्यात येताच तिने मांसाहार आणि पाण्याचा व्यवस्थित स्वीकार केला आहे.

'लाडो' झाली सह्याद्रीची 'हिरकणी'
पेंच व्याघ्र प्रकल्पात या वाघिणीचा अधिकृत क्रमांक PTR-123 असा होता. सह्याद्रीत दाखल झाल्यानंतर तिला आता STR-06 हा शासकीय क्रमांक देण्यात आला आहे. मात्र, सह्याद्रीतील गाईड्स आणि वनरक्षकांनी तिचे अत्यंत प्रेमाने 'हिरकणी' असे नामकरण केले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या भूमीत 'हिरकणी' हे नाव तिच्या साहसी वृत्तीला साजेसे ठरत आहे. आता ही 'हिरकणी' या जंगलात अधिवास असलेल्या STR-03 'बाजी' नावाच्या नर वाघासोबत जोडीदार म्हणून राहणार आहे.

हेही वाचा - Leopard Attack in Satara : प्रचाराला गालबोट; अजितदादा गटाच्या नेत्याच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, थेट झडप घातली अन्..

तीन जिल्ह्यांत पसरलेलं 1165 चौ. किमीचं साम्राज्य
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेला 1,165 चौ. किमी क्षेत्रफळाचा हा व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने नटलेला आहे. राज्य शासनाचा हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. तिसऱ्या वाघिणीच्या समावेशामुळे आता या जंगलात वाघांच्या वंशवृद्धीला मोठी मदत होणार आहे. वन्यजीव संवर्धनासोबतच भविष्यात या भागात पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची दाट शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.

यशस्वी मोहिमेचे सारथी
हे संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गुप्तता आणि काळजीपूर्वक पार पडले. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के आणि विविध वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी यात मोलाची भूमिका बजावली. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि सुनील भोईटे यांच्यासह वनपाल व वनरक्षकांच्या अथक परिश्रमामुळे 'हिरकणी' सुखरूपपणे तिच्या नवीन घरात पोहोचू शकली आहे.

हेही वाचा - Gujarat Leopard Attack: बाप असावा तर असा! मुलाचा जीव वाचवण्यासाठी वडिलांची बिबट्याशी झुंज; भाला अन् विळ्याने...


सम्बन्धित सामग्री