TMC Mahua Moitra X Post on Shiv Sena (UBT) MP Split : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार पक्ष सोडून जाणार असल्याच्या या घडामोडींवर आता तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक खोचक पोस्ट शेअर करत जोरदार निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या डॅशिंग खासदार महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटमधून उबाठा सोडून जाणाऱ्या या खासदारांवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे.
महुआ मोईत्रांकडून कोटींच्या आकड्यांचा उल्लेख करत टोला
महुआ मोईत्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटमध्ये खासदार फुटीच्या या कथित व्यवहारावर संशय आणि उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘फक्त 15 कोटी? एवढ्या स्वस्तात का जात आहेत?’. यापुढे जात त्यांनी आणखी एक उपरोधिक गणित मांडत म्हटले की, ‘आम्हाला 4 कोटी रुपये आगाऊ (अॅडव्हान्स) आणि पुढील 36 महिन्यांसाठी दरमहा 1 कोटी रुपये मिळालेत… हनी प्लस मनी’. त्यांच्या या X पोस्टमुळे राजकीय वर्तुळात आता पैशांच्या कथित देवाणघेवाणीच्या चर्चांना उधाण आले आहे.
सामना अग्रलेखातूनही हल्लाबोल; लोकसभा अध्यक्षांना पत्र
दुसऱ्या बाजूला, ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाकडून कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत. ठाकरे गटाने या फुटीर गटाला स्वतंत्र गट म्हणून संसदेत विशेषाधिकार देऊ नयेत, अशी मागणी थेट लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच शिवसेनेला (उबाठा) आपली बाजू मांडण्याची कायदेशीर संधी देण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातूनही पक्षफुटीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला असून, ‘महाराष्ट्र आणि बंगालसह सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास केली जात आहे,’ अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे.