‘सणांना नाही, अन्नाच्या गुणवत्तेला..’ प्रसादावरील कारवाईवर तुकाराम मुंढेंचे रोखठोक उत्तर

अन्नाची गुणवत्ता टिकवणे आणि अन्न सुरक्षेबाबत लहान वयापासूनच मुलांमध्ये साक्षरता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयएएस तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

‘सणांना नाही, अन्नाच्या गुणवत्तेला..’ प्रसादावरील कारवाईवर तुकाराम मुंढेंचे रोखठोक उत्तर
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe Prasad Action Update: गणेशोत्सवाच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) प्रसादाच्या साहित्यावर केलेल्या धडक कारवाईवरून सुरू असलेल्या वादावर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपले मत अत्यंत स्पष्टपणे मांडले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या कारवाईचे समर्थन केले. सण-उत्सवांच्या दिवसांत अन्नाच्या तपासणीबाबत आदेश जारी केल्यावर टीका होईल आणि ‘सणांमध्ये ढवळाढवळ केली जात आहे’ असा आरोप लावला जाईल, याची पूर्वकल्पना आपल्याला आधीपासूनच होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, ‘मी कोणत्याही सणाला हात लावत नसून केवळ माझ्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेला हात लावत आहे,’ अशा कडक शब्दांत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

‘धर्माविरोधी पाऊल म्हणून न पाहता..’
एफडीएचे हे आदेश पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि संस्कृतीनिरपेक्ष असल्याचे स्पष्ट करत तुकाराम मुंढे म्हणाले की, सण कोणताही असला तरी राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाजारात अन्नपदार्थांना प्रचंड मागणी असते, ज्याचा गैरफायदा घेऊन भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकले जाण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर एफडीएने विशेष मोहीम राबवून सुमारे 6.3 लाख किलो संशयास्पद अन्नपदार्थ जप्त केले, ज्याचे बाजारमूल्य अंदाजे 9.76 कोटी रुपये आहे. त्यामुळे या कारवाईकडे धर्माविरोधी पाऊल म्हणून न पाहता निव्वळ आरोग्य सुरक्षेचा भाग म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – फ्रिज गंजलेला…, शिळ्या अन्नावर कोळ्याचं जाळं; FDA ने ‘या’ प्रसिद्ध कंपनीच्या कॅन्टीनला लावलं टाळं

पुढील काळातही कडक पावले उचलली जातील
केवळ उत्सवांपुरते मर्यादित न राहता, राज्यातील तरुण पिढीच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एफडीए लवकरच व्यापक मोहीम हाती घेणार असल्याचा इशाराही मुंढे यांनी दिला. यामध्ये आरोग्यवर्धक आहाराच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या न्यूट्रास्युटिकल (Nutraceutical) उत्पादनांमधील अनियमितता आणि बनावट मद्यविक्रीविरोधात कडक पावले उचलली जाणार आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी अन्न सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यासाठी समाजात व्यापक लोकचळवळ उभी राहणे काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

लहान वयापासूनच मुलांमध्ये साक्षरता निर्माण करणे आवश्यक
अन्न सुरक्षेचे महत्त्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शालेय स्तरापासूनच जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मुंढे यांनी आवर्जून सांगितले. याच उद्देशाने पहिलीच्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात अन्न सुरक्षेचा समावेश केला जावा, असा एक विशेष प्रस्ताव एफडीएकडून लवकरच राज्य शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे. अन्नाची गुणवत्ता टिकवणे आणि अन्न सुरक्षेबाबत लहान वयापासूनच मुलांमध्ये साक्षरता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – “माणसांसकट एका तासात सगळं जाळेन” वाल्मिक कराडच्या समर्थकाची दादागिरी; Video Viral

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number