Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुणे शहराचे माजी महापौर आणि शरद पवारांचे अत्यंत खंदे समर्थक शांतीलाल सुरतवाला (76) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही काळापासून कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सुरतवाला यांनी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असले तरी, पुण्याच्या राजकीय वर्तुळात त्यांचा मोठा दबदबा होता.
एका निष्ठावान पर्वाचा अंत
शांतीलाल सुरतवाला यांनी 1992-93 या काळात पुणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपद भूषवले होते. काँग्रेसमध्ये असल्यापासून ते शरद पवारांचे सावलीसारखे सोबती राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी शहराध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली होती. "मान कापली तरी साहेबांना सोडणार नाही," ही त्यांची ओळख राजकारणात अखेरपर्यंत 'पवारनिष्ठ' अशीच राहिली. त्यांच्या निधनाने पुण्यातील एका अनुभवी आणि निष्ठावान नेतृत्वाचा अंत झाला आहे.
बारामतीत 'दादां'ना जनसागराचा अखेरचा निरोप
दुसरीकडे, बारामतीमध्ये काल अत्यंत शोकाकुल वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांसह देशभरातील दिग्गज नेत्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी 'एकच वादा, अजित दादा' आणि 'अजित पवार अमर रहे'च्या घोषणांनी संपूर्ण बारामती दुमदुमून गेली होती. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांचा अथांग जनसागर आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना भावूक झाला होता.
हेही वाचा - BJP Suspends Leaders: भाजपचा बंडखोरांवर 'सर्जिकल स्ट्राईक'; 23 पदाधिकाऱ्यांचे निलंबन, कारण आलं समोर
राष्ट्रवादी काँग्रेसवर दुहेरी आघात
एकाच आठवड्यात दोन ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अजित पवारांसारखे खंबीर आणि प्रशासकीय पकड असलेले नेतृत्व, तसेच शांतीलाल सुरतवाला यांच्यासारखा पुण्यातील विश्वासू चेहरा गमावल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या निराशेचे सावट आहे. या दुहेरी आघातातून पक्ष आणि कार्यकर्ते कसे सावरणार, हा मोठा प्रश्न राज्यासमोर उभा राहिला आहे.