विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात मुसळधार कोसळणाऱ्या आणि जराही उसंत न घेतलेल्या पावसाने हाती आलेलं पीक जमीनदोस्त केलं आहे. शेतात अक्षरशः उभ्या पीकाचा चिखल पाहायला मिळत आहे. हाता तोंडाशी आलेलं उभं पीक अवकाळी पावसामुळे मातीत गेलं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच एक वक्तव्य केलंय, शेतकऱ्यांच्या शेतकरी ढेकाळाचे पंचनामे करण्याचे का? असं त्यांनी म्हटलंय, मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील तब्बल 34 महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान होऊनही त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना शासनाचे अधिकारी गेले, ना कोणते पथक गेलं. त्यामुळे आता झालेल्या नुकसानीची भरपाई मागायची कुणाकडे असं म्हणत शेतकरी ढसाढसा रडू लागले, सरकार आमच्याकडे लक्ष देणार का असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील भोकरवाडी येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात शेतकरी गहिनाथ चव्हाण या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा तीन एकर व बाजरी दोन एकर अशी पिके पावसाने सडून गेली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांंचा चिखल झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. साधारणपणे शेतकऱ्याचे पाच ते सहा लाख रुपये आर्थिक नुकसान झाले. शेती खर्चासाठी व्याजाने पैसे काढलेले असताना आता अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्व पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. आता सावकाराचे पैसे कसे द्यायचे, व उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असे प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी गहीनाथ चव्हाण यांनी केले आहेत. अवकाळी पावसामुळे आमच्या शेतात लावलेला कांदा खराब झाला आहे. आता आमची शाळा तोंडावर आली आहे, शाळा तोंडावर आल्यामुळे वह्या, कपडे घ्यावे लागतात. मात्र आमच्या शेतामध्ये असणारे पीक संपूर्ण खराब झाले असल्याने आता वडिलांकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायचा असा प्रश्न शिवप्रसाद चव्हाण या चिमुकल्याने उपस्थित केला आहे.
हेही वाचा : शरीरसंबंधांना नकार दिल्याने पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; चेंबूरमधील धक्कादायक घटना
कुठं,कसं आणि किती झालं नुकसान?
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील तब्बल 34 महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील 17 महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.
अवकाळीने माझं शेतीमलाच पूर्णपणे नुकसान झालेले आहे, यामुळे आम्ही कर्ज बाजारी झालोय, माझ्या नवऱ्याने जर फाशी घेतली तर मी कोणाकडे पाहायचे, एवढे नुकसान होऊन देखील सरकार अथवा शासकीय कर्मचारी साधा पंचनामा देखील करत नाहीत, मग आम्ही जायचं कोणाकडे ? सरकारने तात्काळ पंचनामे करून माझ्या व माझ्यासारख्या नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत सरकारने करावी अशी विनंती कविता चव्हाण यांनी केली आहे. राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रशासनाला, नागरिकांना मदत करण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाचे जे नुकसान झाले आहे. त्याचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. परंतु शेतकऱ्यांचे पंचनामे होणार का? नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा हातभार लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.