पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने आता नवा वळण घेतला असून शिवाजीनगर सत्र न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी धक्कादायक दावा करत संपूर्ण प्रकरण हुंडाबळीचं नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी आरोपींच्या वतीने वकील विपुल दुशिंग यांनी कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवर भर दिला.
विपुल दुशिंग यांनी सांगितलं की, वैष्णवी हगवणे ही मृत्यूपूर्वी काही दिवसांपासून एका व्यक्तीसोबत सातत्याने चॅटिंग करत होती. त्या व्यक्तीचा साखरपुडा 18 मे रोजी ठरलेला होता आणि त्याआधी 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली. त्यामुळे या आत्महत्येमागे इतरही अनेक सामाजिक व मानसिक कारणं असू शकतात, असा युक्तिवाद त्यांनी मांडला.
दुशिंग यांनी पुढे म्हटलं की, वैष्णवीच्या मृत्यूचा तपास केवळ हुंडाबळीच्या चौकटीत न बसवता इतर शक्यताही तपासण्यात याव्यात. त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितलं की, निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी होणं आवश्यक आहे. त्याचं मोबाईल तपासात नसल्याने अनेक बाबी अजूनही समोर आलेल्या नाहीत.
दरम्यान, हगवणे कुटुंबीयांच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या सरकारी वकिलांनी वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांकडे लक्ष वेधून घेतलं. त्यांनी सांगितलं की, शारीरिक छळाच्या गंभीर तक्रारी या प्रकरणात समोर आल्या आहेत. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.
हेही वाचा: ‘मी काही बोलले तर कुटुंबाला मारण्याची...' भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर भावजईचा गंभीर आरोप
कोर्टात झालेल्या या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी जामिनाची मागणी करत सांगितलं की, वैष्णवीच्या सासू, नणंद आणि दीर हे निर्दोष आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही. मात्र सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने निर्णय देताना वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना 3 दिवसांची, तर पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणात वैष्णवीच्या वैयक्तिक आयुष्यावरील चर्चा, हुंड्याचा संशय, आणि कुटुंबातील आर्थिक व्यवहार या सगळ्यांचा गुंता उलगडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेत दोन्ही बाजूंकडून मोठा युक्तिवाद सुरू असतानाच हे प्रकरण आता सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या मुद्द्यालाही स्पर्श करतंय.
आता पुढील तपासात खरे दोषी कोण आणि आत्महत्येच्या मुळाशी नेमकं काय कारण आहे हे स्पष्ट होणं गरजेचं ठरतंय. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या खटल्याच्या पुढील टप्प्याकडे लागलं आहे.