Wednesday, June 18, 2025 02:50:32 PM

Vaishnavi Hagwane case : सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी नणंद करिश्मा हगवणे यांचे घनिष्ठ संबंध?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात करिश्मा हगवणेच्या सुप्रिया सुळे व पवार कुटुंबाशी कथित संबंधामुळे राजकीय खळबळ; छळप्रकरणी गुन्हा दाखल, आरोपी अटकेत, काही फरार.

vaishnavi hagwane case  सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी नणंद करिश्मा हगवणे यांचे घनिष्ठ संबंध

पुणे: वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता एक नवी आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील बाब समोर येत आहे. नणंद करिश्मा हगवणे हिचे खासदार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी असलेले कथित संबंध.

वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली असून, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे करिश्मा हगवणे हिचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी असलेला स्नेहसंबंध. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर करिश्मा हगवणेच्या कौशल्याचे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली होती. तसेच करिश्मा आणि सुनेत्रा पवार यांच्यातही घनिष्ठ मैत्री असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक राजकारणातील काही वृत्तांनुसार, हगवणे कुटुंबाचे पवार कुटुंबाशी अनेक वर्षांपासून स्नेहाचे आणि सहकार्याचे संबंध आहेत. विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये दोन्ही कुटुंबांची उपस्थिती आणि सहवास पाहायला मिळत होता, ज्यामुळे हगवणे कुटुंबाला राजकीय वरदहस्त मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; मोठ्या जावेवरही अत्याचार, मयुरी हगवणेने उघड केला प्रकार

करिश्मा, उर्फ पिंकी ताई, ही कुटुंबातील सर्व निर्णय स्वतः घेत असे. कोणते कपडे घालायचे, कोणत्या साड्या नेसायच्या, कोणते जेवण करायचे;  हे सर्व ती ठरवत असे. वैष्णवीसह दुसरी सून मयुरी जगताप हिलाही करिश्माच्या अतिरेकी वागणुकीचा सामना करावा लागला. मयुरीच्या म्हणण्यानुसार, 'करिश्मा ताई हीच खरी सासू होती. ती भावांनाही भडकवत असे. वैष्णवीला मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं.'

राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य होते. त्यामुळे हगवणे कुटुंबाच्या राजकीय संबंधांची पार्श्वभूमी आधीपासूनच आहे. आता करिश्मा हगवणेचा पवार कुटुंबाशी असलेला कथित स्नेह उघडकीस आल्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत आहेत.

राजकीय संबंधांचे जाळे, घरातील सत्ताकारण आणि एका सुनेचा संपलेला जीव, या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करिश्मा हगवणे आणि तिच्या पाठीमागे असलेल्या ताकदींचा तपास लावण्यासाठी निष्पक्ष आणि सखोल चौकशी अत्यावश्यक आहे. एका शिक्षित तरुणीने केवळ मानसिक त्रासामुळे आत्महत्या करावी, आणि तिच्या छळकर्त्यांना राजकीय संरक्षण मिळावे, हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.


सम्बन्धित सामग्री