Sunday, June 15, 2025 12:36:52 PM

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; मोठ्या जावेवरही अत्याचार, मयुरी हगवणेने उघड केला प्रकार

पिंपरीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप. मोठी जाऊनेही मारहाणीचे फोटो पुराव्यांसह पोलिसांना तक्रार दिली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे मोठ्या जावेवरही अत्याचार मयुरी हगवणेने उघड केला प्रकार

पुणे: पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवे आणि धक्कादायक तपशील समोर आले आहेत. वैष्णवीने 16 मे 2025 रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर पोलिस तपासात सासरच्या मंडळींनी सातत्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे उघड झाले आहे. तिच्या वडिलांनी सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात आता वैष्णवी हगवणे यांची मोठी जाऊ, मयुरी हगवणे हिनेही गंभीर आरोप करत नव्या आणि धक्कादायक माहितीचा खुलासा केला आहे. मयुरीने पौड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी तिचाही छळ केला होता. तिला मानसिक त्रास देण्यात आला, घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तिच्यावर शारीरिक मारहाणही झाली. तिने दिलेल्या तक्रारीसोबत काही फोटो पुराव्यादाखल सादर केले असून, त्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि हातांवर झालेल्या जखमा स्पष्टपणे दिसून येतात.

मयुरीने सांगितले की, 'मी या कुटुंबाची मोठी सून आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर माझ्यावरही संशय घेतला गेला. मला घरात डावलण्यात आले, मारहाण करण्यात आली, धमकावण्यात आले. मी जेव्हा आवाज उठवला, तेव्हा मला चुप करण्याचा प्रयत्न झाला.' तिच्या या आरोपांमुळे हगवणे कुटुंबावर आणखी संशयाचे सावट गडद झाले आहे.

वैष्णवीच्या प्रकरणात आधीच तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 26 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरही वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला बाळ सासरकडील नातेवाइकांकडे होते, मात्र महिला आयोगाच्या हस्तक्षेपामुळे अखेर बाळाची जबाबदारी वैष्णवीच्या आईवडिलांकडे देण्यात आली.

ही संपूर्ण घटना उघड झाल्यानंतर पुण्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी आणि मयुरी यांच्यासारख्या महिलांना न्याय मिळावा, या मागणीसाठी महिला आयोग, सामाजिक संघटना आणि अनेक नेते पुढे आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही हे आत्महत्या प्रकरण नसून, एका निर्दोष महिलेला छळून मरणाला प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.


सम्बन्धित सामग्री