Suicide of a class 10th student in Ahmedabad
Edited Image
अहमदाबाद: शहरातील नवरंगपुरा परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. सोम ललित शाळेच्या चौथ्या मजल्यावरून एका 16 वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.
दुपारी जेवणाच्या सुट्टीत सुमारे 12.30 वाजता ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थिनी वर्गातून बाहेर पडून लॉबीमध्ये जाताना आणि रेलिंगवरून थेट उडी मारताना दिसून येत आहे. ही दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस तपास सुरू
प्राप्त माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी तिच्या आई-वडील आणि लहान भावासोबत राहत होती. तिचे वडील नवरंगपुरा भागात दुकान चालवतात. सकाळी त्यांनी तिला शाळेत सोडलं होतं. दुपारी 12.45 वाजता त्यांना फोन आला की, त्यांच्या मुलीला गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा - राजस्थानामधील सरकारी शाळेचे छत कोसळले; 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 28 जण जखमी
पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल फोन जप्त केला असून, शाळेतील सहाध्यायी, शिक्षक आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. शाळा प्रशासनाने घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत.
हेही वाचा - नायगावमध्ये 12 व्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट -
मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच हात आणि पाय फ्रॅक्चर झाले होते. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या टोकाच्या निर्णयामागे नेमकं काय कारण होतं, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. ही घटना केवळ एक अपघात होता की, त्यामागे मानसिक ताण, दबाव किंवा शाळेतील काही अन्य कारणं होती, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.