चातकापरी पावसाची वाट पाहणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या कीह दिवसांपासून मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून आता मुंबईकरांचीही पावसाची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमेक्रेचे वारे वेगवान झाल्यामुळे कोकण किनारपट्टी सराबोर होईल. त्यामुळे कोकण, गोवा, मुंबई आणि ठाणे या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात मान्सूनचा जोर प्रचंड वाढणार आहे. तसेच कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात माहिती देताना राज्यातील काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून आकाशात काळ्या ढगांची दाटी दिसून येत आहे.
सकाळी साडेदहाच्या सुमारास लांजा परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असून त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, वाशिम या भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अकोला, वर्धा, ब्रह्यपुरी, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती, भंडारा, गोदिंया,जळगाव जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
आज अहिल्यानगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, गडचिरोली, गोदिंया, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नांदेड शहरासह जिल्ह्यात आज रिमझिम पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नांदेडकरांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागातही हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.