Amit Thackeray: तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून नाशिकमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. “कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडे कापून ती जमीन नक्की कोणाच्या घशात घालणार आहात?” असा थेट सवाल करत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. जोपर्यंत या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत एकही झाड कापून देणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला. “मी आयुक्तांना भेटायला आलो तर ते जागेवर नाहीत. महापौर म्हणतात हा आयुक्तांचा निर्णय आहे. हे सर्व निवडणूक आयोगासारखे एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम सुरू आहे,” अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा नाशिकला येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
महापालिकेवर धडक मोर्चा
तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना पाठिंबा देण्यासाठी अमित ठाकरे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. हुतात्मा स्मारकापासून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व करत त्यांनी सकाळी 11:10 वाजता महापालिकेच्या ‘राजीन गांधी भवन’ या मुख्यालयावर धडक दिली. यावेळी आयुक्त उपस्थित नसल्याने त्यांनी महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्याशी चर्चा केली.
‘मनसेच्या काळातही कुंभमेळा झाला, पण…’
यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करताना अमित ठाकरे म्हणाले की, “नाशिकमध्ये मनसेची सत्ता असतानाही कुंभमेळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला होता. मात्र, त्यावेळी आम्ही तपोवन परिसरातील एकाही झाडाला हात लावला नव्हता. मग आताच झाडे तोडण्याची एवढी घाई का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय
चर्चेदरम्यान महापौर हिमगौरी आडके यांनी हा निर्णय आयुक्तांच्या अधिकारात असल्याचे स्पष्ट केले. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची एक ‘समन्वय समिती’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. अमित ठाकरे यांनी या समितीसाठी 11 जणांची नावे देण्याची तयारी दर्शवली असून, समितीची बैठक होईपर्यंत वृक्षतोडीला पूर्णपणे स्थगिती देण्याची मागणी केली आहे.