पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुणे शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांनी जामीनासाठी धाव घेतली आहे.
वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर सासू लता हगवणे आणि नणंद करिषमा हगवणे या दोघींनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. सासूला शारिरीक व्याधी असल्याने जामीन हवा असल्याची माहिती मिळत आहे. शिवाजीनगर सत्र न्यायालयात जामीनासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा : हगवणेंची हाव पुरवण्यासाठी कस्पटेंचा अमाप खर्च; नवा व्हिडीओ समोर
कोर्टात काय युक्तिवाद झाला?
वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी बुधवारी कोर्टात युक्तिवाद झाला. त्यानंतर एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज कोर्टात दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपींना पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद हगवणेंचा वकिलांनी केला. तसेच न्यायालयात वैष्णवीची बदनामी करण्यात आली. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. त्या मुलाचा साखरपुडा 18 तारखेला झाला होता. त्यामुळे वैष्णवी त्याला कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिल्याने तिने आत्महत्या केली असेल, असे हगवणेंच्या वकिलांनी म्हटले.
पुढे बोलताना, यापूर्वीही वैष्णवीने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का?, प्लॅस्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? असे सवाल हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केले.
यानंतर हगवणे कुटुंबीयांची बाजू घेत वकील म्हणाले की, हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, मग ते 40 लाखांच्या फॉर्च्यूनरसाठी वैष्णवीचा छळ का करतील? हगवणे कुटुंबाचे सोने कौटुंबिक व्यवसायासाठी गहाण ठेवले आहेत. सोन्याच्या दागिन्यांविषयी मीडियात चुकीचं सांगितलं जात आहे', असा युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांनी केला आहे.