Saturday, July 12, 2025 12:20:45 AM

अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून पत्नीची पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन निर्घृण हत्या; पतीसह पाच जणांना अटक

धुळे शहरात पतीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे पत्नीचा पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन खून; पतीसह पाच जण अटकेत, परिसरात खळबळ.

अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून  पत्नीची पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन निर्घृण हत्या पतीसह पाच जणांना अटक

धुळे: धुळे शहरातील वलवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीने केवळ अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून निर्दयपणे ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती कपिल बागुल (सैन्य दलातील कर्मचारी) याने पत्नी शारदा बागुल हिला जबरदस्तीने पेस्टिसाइडचं इंजेक्शन देत निर्घृणपणे तिचा खून केला. या प्रकरणी धुळे येथील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीसह एकूण पाच जणांना अटक केली आहे.

मयत शारदा बागुल ही विवाहानंतर नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला विरोध करत होती. कपिल बागुल याचे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. लग्न झाल्यानंतरही तो संबंध चालूच राहिले. पत्नी शारदाने यास तीव्र विरोध केला होता. हा विरोध डोळ्यांत खुपल्यामुळे कपिलने आपली पत्नी संपवण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण पूर्वनियोजित कट रचला.

हेही वाचा: धक्कादायक प्रकार उघड ; शिर्डी संस्थानात कर्मचाऱ्यानेच केली लाखो रुपयांची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलने आपल्या कुटुंबीयांना आणि प्रेयसीला या कटात सामील केलं. त्यांनी मिळून शारदाला तिच्या राहत्या घरी पेस्टिसाइडचं इंजेक्शन जबरदस्तीने दिलं. या घटनेनंतर शारदाची प्रकृती खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शारदाच्या नातेवाईकांना तिच्या मृत्यूबद्दल संशय आल्यामुळे त्यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चौकशीतून कपिलच्या अनैतिक संबंधांची आणि पत्नीच्या हत्येच्या कटाची माहिती समोर आली. त्यानंतर कपिल बागुल, त्याची आई, वडील, बहीण आणि प्रियसी अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सध्या आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलमांनुसार खून, कट रचना आणि छळ यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरु आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे वलवाडी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. एका पत्नीने केवळ नवऱ्याच्या चुकीच्या वागणुकीचा निषेध केल्यामुळे आपले प्राण गमावावे लागल्याची ही दुर्दैवी घटना आहे.


सम्बन्धित सामग्री