Wednesday, June 18, 2025 02:51:20 PM

सोलापुरात गर्भवती महिलेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय

मोहोळ तालुक्यात आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी ती हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

सोलापुरात गर्भवती महिलेची आत्महत्या सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय

सोलापूर: पुण्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी परिसर हादरवणारी घटना घडली आहे. आशाराणी भोसले या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला, तरीही तिच्या मृत्यूमागे काही संशयास्पद बाबी समोर येत आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असावी, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

आशाराणी भोसले या 25 वर्षांच्या युवतीचे लग्न तीन वर्षांपूर्वी मोहोळ तालुक्यात झाले होते. तिला तीन वर्षांची एक मुलगी असून, सध्या ती तीन महिन्यांची गर्भवती देखील होती. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, सासरच्या मंडळींकडून मिळणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे.

हेही वाचा: JCB फसवणूक प्रकरणात हगवणे कुटुंबीयांसोबत इंडसइंड बँकही चौकशीच्या फेऱ्यात

चिंचोली एमआयडीसी येथे राहत असलेल्या आशाराणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर तिला तात्काळ मोहोळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आशाराणीच्या नातेवाईकांनी यास आत्महत्या न मानता, सुसूत्र पद्धतीने घडवून आणलेली हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आशाराणीवर तिच्या सासरच्या लोकांनी अनेक वेळा मानसिक आणि शारीरिक दबाव आणला होता. घरगुती वाद सतत होत असल्याने कुटुंबीयांनी चार ते पाच वेळा दोन्ही बाजूंनी बैठक घेऊन समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्रास थांबला नाही, उलट वाढत गेला.

हेही वाचा: भंडाऱ्यात पाच वर्षांत 20 बालविवाह उघड; पालकच जबाबदार, सहा प्रकरणांत गुन्हे दाखल

सध्या मोहोळ पोलीस ठाण्यात आशाराणी भोसले यांच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणाने पुन्हा एकदा महिला अत्याचार, सासरचा छळ आणि मानसिक त्रासाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधले आहे. सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
 


सम्बन्धित सामग्री