Wednesday, November 19, 2025 12:48:06 PM

Raj Thackeray On EC: 'तुम्ही फक्त महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा...'; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला थेट आव्हान

मुंबईतील मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले की, 'सध्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी आहेत. एका घरात शेकडो लोकांची नावं दाखवली जात आहेत.

raj thackeray on ec तुम्ही फक्त महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला थेट आव्हान

Raj Thackeray On EC: आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत थेट आव्हान दिलं आहे. मतदार याद्यांमधील गोंधळ आणि बनावट नोंदींचं शुद्धीकरण झाल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुंबईतील मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले की, 'सध्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी आहेत. एका घरात शेकडो लोकांची नावं दाखवली जात आहेत. काही जण तर मतदारच नाहीत, तरीही त्यांची नोंद आहे. ही परिस्थिती लोकशाहीसाठी धोकादायक आहे.'

राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मतदार यादी तपासण्याचे निर्देश दिले. यादी प्रमुख, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गटाध्यक्ष यांनी घराघरात जाऊन तपासणी सुरू करा. कोण राहतो, किती जण राहतात, हे नीट पाहा. मतदार यादीतील प्रत्येक त्रुटी उघडकीस आली पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

हेही वाचा - Murlidhar Mohol vrs Raju Shetti: मुरलीधर मोहोळ यांच्या वादग्रस्त व्यवहारावर राजू शेट्टींचा आरोप; ५० कोटींचा व्यवहार रद्द करण्याची मागणी

मनसे प्रमुखांनी सर्वसामान्य मतदारांनाही जागरूक राहण्याचं आवाहन करत म्हटलं, 'तुमचं नाव योग्य ठिकाणी आहे का ते तपासा. आमचे कार्यकर्ते घरी आले, तर त्यांना सहकार्य करा. हे काम महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात सुरू व्हायला हवं.' निवडणूक आयोगावर टीका करत राज ठाकरे म्हणाले, पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत, अजून एक वर्ष थांबलं तरी चालेल. पण मतदार यादी स्वच्छ नसेल तर निवडणुका घेऊ नका. निवडणुका घेण्याची ही घाई संशयास्पद आहे. 

हेही वाचा - Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डिसेंबरमध्ये; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार घोषणा

दरम्यान, राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, 'निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे व्हायला हव्यात. कोण जिंकेल, कोण हरेल, याचा मला फरक पडत नाही. पण जे मतदान होईल ते खरं आणि प्रामाणिक असावं. निवडणुका हे लोकशाहीचं प्रतिबिंब आहेत, त्यावर कुणाचं डाग लागू नये.' राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. आगामी निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांचा मुद्दा हा आता चर्चेचा आणि वादाचा प्रमुख विषय बनला आहे. 


सम्बन्धित सामग्री